Australia India vs Pakistan: टीम इंडियानं मेलबर्नवर साकारला 'विराट' विजय
रोहित शर्माच्या टीम इंडियानं ऑस्ट्रेलियातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात पाकिस्तानला लोळवून सनसनाटी विजयी सलामी दिली. टीम इंडियानं हा सामना चार विकेट्सनी जिंकला. या सामन्यात पाकिस्ताननं भारताला विजयासाठी १६० धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सातव्या षटकांत चार बाद ३१ अशी केविलवाणी अवस्था झाली होती. पण विराट कोहली आणि हार्दिक पंड्यानं पाचव्या विकेटसाठी ११३ धावांची झुंजार भागीदारी रचली. त्यांच्या या भागिदारीनं भारताला विजयाच्या दिशेनं नेलं. हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक मोक्याच्या क्षणी बाद झाले. पण विराट कोहली आणि रवीचंद्रन अश्विननं भारताच्या सनसनाटी विजयावर शिक्कामोर्तब केलं. टीम इंडियाला अखेरच्या १८ चेंडूंत विजयासाठी ४८ धावांची आवश्यकता होती. त्या परिस्थितीत भारतीय फलंदाजांनी शाहिन आफ्रिदीच्या षटकात १७ धावांची, हॅरिस रौफच्या षटकात १५ धावांची आणि मोहम्मद नवाझच्या अखेरच्या षटकात १६ धावांची लूट केली.























