Punjab : पंजाबमध्ये राजकीय भूकंप? Capt Amarinder Singh अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना
पंजाबच्या (Punjab) राजकारणाने वेगळं वळण घेतलं असून कॅप्टन अमरिंदर सिंग हे दिल्लीसाठी रवाना झाले असून ते आज संध्याकाळी अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासोबत झालेल्या वादानंतर काँग्रेस हायकमांडने कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा घेतला होता. त्यामुळे ते नाराज झाले होते.
पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंह सिद्धू यांची नियुक्ती केल्यानंतर सिद्धू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यातील वाद मिटण्याची आशा काँग्रेस हायकमांडला होती. पण तसं न होता हा वाद अधिक चिघळत गेला. शेवटी कॅप्टन अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.
'आतापर्यंत झाला तो अपमान बस झाला, यापुढे असा अपमान सहन करत काँग्रेसमध्ये राहू शकत नाही' असा इशारा कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काँग्रेस हायकमांडला दिला होता. त्यानंतरही त्यांचा राजीनामा घेण्यात आला. राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपण नाराज असल्याचं सांगत आपल्यासाठी सर्व मार्ग खुले असल्याचंही सांगितलं होतं.