(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Belgaum Election Result : बेळगावचा सत्ताधीश कोण? आज मतमोजणी, 385 उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला
Belgaum Municipal Corporation Election : बेळगाव महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी आज (सोमवारी) सकाळी आठ वाजता सुरु होणार आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनी प्रथमच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. भाजप, काँग्रेस बरोबर आप, एमआयएम, निधर्मी जनता दल देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बेळगाव महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी बीके मॉडेल हायस्कूल येथे सोमवारी होणार असून सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी (Belgaum Municipal Corporation Election) एकूण 58 प्रभागांची मतमोजणी होणार आहे. एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप 55, काँग्रेस 45, महाराष्ट्र एकीकरण समिती 21, जेडीएस 11, आम आदमी 37, एआयएमआयएम 7, अन्य दोन आणि अपक्ष 217 उमेदवारांचे भवितव्य सोमवारी ठरणार आहे. मतमोजणी केंद्रात पाचशे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्राच्या परिसरात 144 कलम जारी करण्यात आले आहे. शहरात मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात 1500 पोलीस बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्राकडे जाणारे सगळे रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत. दुपारी बारा वाजेपर्यंत सगळे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. अनेक माजी महापौर, उप महापौर निवडणुकीपासून अलिप्त राहिले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात बहुतांश चेहरे नवीन आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेळगाव महानगरपालिका निवडणुकांसाठी 3 सप्टेंबर रोजी मतदान पार पडलं असून आज, 6 सप्टेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. मराठी भाषिकांनी बेळगावचा गड राखण्याची तयारी सुरु केली होती. बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान पार पडलं.
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी बी के मॉडेल हायस्कूल येथे सोमवारी होणार असून सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. बीके मॉडेल हायस्कूलमध्ये स्ट्राँग रुममध्ये मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत. मतमोजणी केंद्रावर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. हायस्कूलच्या आवारात कोणालाही जाण्यास परवानगी नाही. निवडणुकीच्या रिंगणात एकूण 385 उमेदवार असून त्यांचे भवितव्य सोमवारी ठरणार आहे. राष्ट्रीय पक्षांनी प्रथमच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. मतदान केवळ पन्नास टक्के झाल्यामुळं राष्ट्रीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना निकाल काय लागणार? याची धाकधूक लागली आहे. मतदान यादीतून दहा हजार मतदारांची नावं गायब झाल्यामुळे अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही. राष्ट्रीय पक्षांनी प्रथमच पक्षाच्या चिन्हावर लढविलेली निवडणूक, आप, एमआयएम पक्षांनी निवडणुकीच्या रिंगणात केलेली एंट्री, भाजप मधील नाराजांची समजूत काढण्यात भाजप नेत्यांना आलेले अपयश,अनेक प्रभागात एकाहून अधिक निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकलेले मराठी भाषिक उमेदवार ही यावेळच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची वैशिष्ठ्ये म्हणावी लागतील.