Gondia Rain Update : गोंदियातील पांगोली नदीने धोक्याची पातळी ओलांडली, वाहतूकीसाठी मार्ग बंद
गेल्या दोन दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. गोंदिया शहराच्या जवळून वाहणाऱ्या पांगोली नदीच्या पाणीपत्रात देखील वाढ झाली आहे. या नदीवर बारब्रिक्स कंपनीच्या वतीने पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे पर्यायी पूल तयार करण्यात आला आहे. मात्र हा पर्यायी पूल कमी उंचीचा असल्याने कुठल्याही क्षणी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून त्यामुळे आमगाव आणि सालेकसा अशा दोन तालुक्यांचा संपर्क जिल्हा मुख्यालयापासून तुटला आहे. या मार्गावरून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच पुलावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र आता पहिल्याच पावसात हा मार्ग बंद झाल्याने पावसाळ्यात काय स्थिती राहणार ?? असा सवाल स्थानिकांनी उपस्थित करत बारब्रिक्स कंपनीच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.