(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CM Thackeray : औरंगाबादमधील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे
औरंगाबाद : काही काळापासून रखडलेल्या औरंगाबादमधील संत एकनाथ महाराज रंगमंदिर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम अखेर पूर्ण झाले असून नुकताच त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवत उपस्थितांसह अवघ्या महाराष्ट्राला संबोधित केले. यावेळी औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. तसंच तेथील निवडणूकीत शिवसैनिकांनी कधीच निराश केलं नाही पुढेही करणार नाहीत असा विश्वासही दर्शवला. दरम्यान औरंगाबादमधील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असून लवकरच केंद्राचा आदेश येईल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमाला उपस्थित राहिले असताना ठाकरे यांनी औरंगाबादमधील अनेक प्रश्न शिवसेने सोडवले असल्याचं सांगितलं. यावेळी सर्वात मुख्य असं समांतर जलवाहिन्यांच्या कामाबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. तसंच मी स्वत: येऊन या कामाची तपासणी करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान संभाजीनगर या नावाचा प्रश्न कायम असून येथील विमानतळाला मात्र छत्रपती संभाजीनगर विमानतळ नाव देण्याचा प्रस्ताव सर्वांनी मंजूर केला असून हा प्रस्ताव सध्या केंद्र दरबारी असून तो लवकर मान्य होईल अशी आशा व्यक्त करत विमानतळाच्या बारसं करायला मिळेलं असंही ते म्हणाले. तसंच जनतेची सेवा करताना राजकारण त्यामध्ये आणता कामा नये. असं ठाकरे यांनी आवर्जून सांगितलं.