Akola Woman Rescued : वृद्ध महिला 18 तास पुराच्या पाण्यात संघर्ष, झाडाच्या फांदीमुळे बचावल्या आजी
'काळ आला होता, पण वेळ आली नव्हती', या म्हणीचा प्रत्यय अकोला जिल्ह्यातील आपोती गावात नुकताच आला. अमरावतीच्या वत्सलाबाई राणे या वृद्ध महिला 21 जुलैला ऋणमोचन येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्या मंदिराशेजारी असलेल्या पूर्णा नदीत पाय धुण्यासाठी उतरल्या. परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं त्या वाहून गेल्या. गावातल्या युवकांनी त्या वृद्ध महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना त्यात यश आलं नाही. काल दुपारी बाराच्या सुमारास मुर्तिजापूर तालुक्यातील येंडली गावानजिकच्या पूर्णा नदीत एका गुराख्याला वाचवा, वाचवा असा आवाज आला. त्यानं ती गोष्ट गावात सांगितल्यावर गावातील तरुणांनी एका वृद्ध महिलेला त्या पाण्यातून बाहेर काढलं. ऋणमोचन येथून वाहून गेलेल्या त्याच या वृद्ध महिला होत्या. त्यांना सुदैवानं झाडाच्या एका फांदीचा आधार मिळाला. आणि त्या एका फांदीच्या आधारानं त्यांनी तब्बल 18 तास पुराच्या पाण्यात संघर्ष करून तग धरला. त्या आजीचा जीव वाचल्यामुळं तिच्या कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय.