Jayant Patil on Defeat : इतकी फिल्डींग लावूनही पराभव का? जयंत पाटील म्हणाले काँग्रेसची मत फुटली
Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024 : शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा विधानपरिषद निवडणुकीत पराभव झाला आहे. जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून समर्थन पुरस्कृत उमेदवार होते. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 3 असे 12 उमेदवार मैदानात होते. दोन्ही गटांकडून आमचे सर्व उमेदवार निवडून येणार, असा दावा केला जात होता. त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणार होता, मात्र तो नेमका कोणाचा हे निकालानंतरच स्पष्ट झाले. शेकपच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. जयंत पाटील यांना पहिल्यापासूनच आघाडी मिळाली नाही. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये जयंत पाटील यांना दुहेरी आकडाही ओलांडता आला नव्हता. विजयासाठी जयंत पाटील यांना 23 संख्यापर्यंत पोहचायचं होतं. पण जयंत पाटील यांना फक्त 12 मते मिळाली. पराभवानंतर जयंत पाटील संपत्प झाले होते. मतमोजणी सुरु असतानाच त्यांनी काढता पाय घेतला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ते तात्काळ अलिबागसाठी रवाना झाले होते.
पराभवानंतर जयंत पाटील काय म्हणाले...
विधानपरिषदेत पराभव झाल्यानंतर जयंत पाटील तडकाफडकी अलिबागसाठी रवाना झाले. एबीपी माझाने त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आता प्रतिक्रिया द्यायला नको, असे त्यांनी सांगितलं. मविआचं काय चुकलं यावर पाटील म्हणाले,"माझी बारा मते मला मिळाली. काँग्रेसची मते त्यांना मिळाली. काँग्रेसची काही मते फुटली. जाऊदे आता नको बोलायला. "























