दहावी-बारावी परीक्षांसंदर्भात शिक्षणमंत्री काय करणार? मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा गायकवाडांची चर्चा
मुंबई : देशात आणि खासकरुन महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वेगवेगळे निर्बंध घातले गेले आहेत. अशात राज्य सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा देखील निर्णय घेतला आहे. मात्र राज्यातील लाखो विद्यार्थी देणार असलेल्या दहावी आणि बारावी परीक्षांचं काय होणार? याकडे लक्ष लागून आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आधी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विना परीक्षा पास करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना देखील पुढच्या वर्गात वर्गोन्नती देण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला. मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षा ह्या ऑफलाईन घेण्यावर सरकार अद्याप तरी ठाम आहे.



















