HSC Exams : शिक्षक महासंघानं बारावी उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला
कनिष्ठ महाविद्यालयातल्या शिक्षकांच्या प्रतिनिधींनी आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीत उभयपक्षी चर्चा यशस्वी झाली आहे. या बैठकीनंतर कनिष्ठ महाविद्यालयातल्या शिक्षकांनी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतला आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. ही परीक्षा सुरू असतानाच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला होता. जुनी पेन्शन योजना लागू करणं, आश्वासित प्रगती योजना, रिक्त पदं भरणं आदी मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आंदोलनाचं अस्त्र उपसलं होतं.


















