Nashik Crime News : भाजप नेते अमोल इघे यांची हत्या, नाशिक हादरलं ABP Majha
Nashik Crime News : भाजप नेत्याच्या खूनामुळे नाशिक पुन्हा एकदा हादरलं आहे. नाशकात पाच दिवसात तिसरा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शुक्रवारी सकाळी नाशिकमध्ये सातपूर भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी अज्ञात व्यक्तीने अमोल इघे यांना फोन करून बाहेर बोलावून घेतलं. त्यानंतर धारधार शस्त्राने सपासप वार करत हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. राजकीय पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकाराने परिसरात खळबळ माजली आहे. तसेच शहरातील पोलिसांच्या गस्ती बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मंडल अध्यक्ष अमोल इघे यांचा खून झाल्यानंतर नाशिक भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. सातपूर पोलीस ठाण्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. भाजप आमदार राहुल ढिकले,सीमा हिरे आणि शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह पदाधिकारी ठिय्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. अमोल इघे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास भाजप पदाधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ आणि पोलीस आयुक्त दीपक पांडे यांना हटविण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. जोपर्यंत आरोपी गजाआड जात नाही, पालकमंत्री, पोलीस आयुक्त बदलले जात नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार, अशी पवित्रा भाजपने घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये हत्येचं सत्र सुरूच आहे. नाशिकमधील विविध भागात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे, त्यामुळे नाशिकमधील पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गेल्य काही दिवसांपूर्वी म्हसरुळला सराईत गुन्हेगाराची तीक्ष्ण हत्याराने खून करण्यात आल्याची घटना घडली होती. दोन दिवसांपूर्वी पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेठरोडवरील आरटीओ कार्यालयाजवळ एका भाजी विक्रेत्याची डोक्यावर दगड टाकून ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.