Zero Hour : दिवसभरातील 3 वेगळ्या आणि महत्त्वाच्या बातम्या : 18 July 2024 : ABP Majha
जाता जाता एक सकारात्मक बातमी..
राज्याचे नवे पर्यटन धोरण जाहीर झालं त्याचा शासन निर्णय म्हणजे G.R आज निघाला.. नव्या धोरणातून राज्यात १८ लाख रोजगार निर्मिती होणार असून १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असल्याचं पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं.
ग्रामीण आणि शहरी भागात पर्यटनाद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करण्यावर भर दिला जाईल. १० वर्षात पर्यटनस्थळे तसेच पायाभूत सुविधा विकसित करुन पर्यटकांचा ओघ दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे. या धोरणामुळे आपला महाराष्ट्र पर्यटनाच्या बाबतीत देशातील अग्रेसर राज्य बनेल अशी आशा .
दुसरी बातमी क्रिकेटप्रेमींसाठी महत्वाची..
भारताच्या श्रीलंका दौ-यासाठी टीम इंडियाला नवा कर्णधार मिळालाय.. ३ टी ट्वेंटी सामन्यांसाठी सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर टीम इंडियाची धुरा असेल. झिम्बाब्वे दौऱ्यात गेलेल्या युवा टीमचा कप्तान राहिलेला शुभमन गिल श्रीलंका दौऱ्यात उप कप्तान असणार आहे.
या दौऱ्यातील ३ एकदिवसीय सामन्यांसाठी रोहित शर्मावरच कप्तानपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. या वनडे मालिकेत सुद्धा शुभमन गिल उपकप्तान असेल. मुंबईकर श्रेयस अय्यरचं पुनरागमन हे या दौऱ्याचं आणखी एक वैशिष्ट्य असेल. २७ जुलै ते ३० जुलै टी ट्वेंटी सामने खेळवले जातील तर २ ऑगस्ट पासून एकदिवसीय मालिका सुरु होईल.
तिसरी बातमी बघुयात..निवडणुकीच्या राजकारणात आता शेतकरी आघाडीचा वेगळा पर्याय मिळणार आहे.. राजू शेट्टी, वामनराव चटप यांच्यासह काही शेतकरी संघटनांची पुण्यात बैठक झाली, यात शेतकरी आघाडीची घोषणा करण्यात आली. परिवर्तन आघाडी असं या आघाडीचं नाव असणार आहे. महायुती आणि महाआघाडी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या परिवर्तन आघाडीचा पर्याय देत असल्याचं राजू शेट्टींनी सांगितलं.
या बातम्यांसोबतच झीरो अवरमध्ये आज इथेच थांबुयात..
उद्या संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी पुन्हा भेटुयात.. पाहात राहा एबीपी माझा..