Zero Hour | कल्याणमध्ये चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, आरोपीला फाशी कधी होणार! ABP Majha
Zero Hour | कल्याणमध्ये चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, आरोपीला फाशी कधी होणार! ABP Majha
विशाल गवळी नावाच्या एका नराधमानं कल्याणमध्ये एका १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे त्या मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी विशालला त्याच्या पत्नीनंच मदत केल्याचा आरोप आहे. त्यामुळं पोलिसांनी विशालसह त्याच्या पत्नीलाही अटक केली आहे. त्या दोेघांनाही दोन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुण्याजवळच्या राजगुरुनगरमध्ये शेजारी राहणाऱ्या एका आचाऱ्यानं दोन चिमुकल्या मुलींची हत्या केली. त्या दोन मुलींना चॉकलेटचं आमिष दाखवून हा नराधम त्यांना आपल्या घरी घेऊन गेला. तो एका मुलीवर अत्याचार करताना तिनं प्रतिकार केला. ओरडायला सुरुवात केली. त्यामुळं तो नराधम आचारी घाबरला आणि त्यानं तिची हत्या केली. हा सारा प्रकार दुसऱ्या चिमुकलीनं पाहिला. ती सर्वांना सांगेल या भीतीनं त्यानं तिचाही जीव घेतला. काही महिन्यांपूर्वी बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना घडली होती. त्यामुळं संतप्त झालेल्या नागरिकांकडून बदलापूर रेल्वे स्थानकात आठ तास रेल रोको करण्यात आला होता. त्यानंतर पुण्यातील एका नामांकित शाळेत एका शिक्षकानं चिमुकल्या मुलांवर लैंगिक अत्याचार केले. या साऱ्या घटना मन सुन्न करून टाकत असतानाच थरकाप उडवणारी आणखी घटना पुण्यातील कोंढवा भागात घडली. दहा दिवसांपूर्वीच्या या घटनेत एका नऊ वर्षांच्या मुलानं तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं. या सगळ्या घटना ऐकल्या तुमची आमची अवस्था काही सुचेनासं होणारी होती. एक माणूस म्हणून आपण कुठे चाललोय, असा प्रश्न पडतो. आज आपल्या अनेकांच्या घरात मुली आहेत. कुणाच्या मुली अगदी लहान आहेत, कुणाच्या मुली तारुण्याच्या उंबरठ्यावर आहेत, कुणाच्या मुली लग्न होऊन नुकत्याच आपल्या सासरीही गेल्या आहेत. पण मुलगी चिमुरडी असो किंवा सज्ञान, ती कुठेच सुरक्षित नाही, असं का झालंय? घर, शाळा, कॉलेज, ऑफिस, ट्रेन, टॅक्सी, फुटपाथ, हॉटेल, सिनेमा थिएटर... यापैकी कुठली जागा उरलीय, जिथे मुलींवर अत्याचार होत नाहीयत? आणि गेल्या काही वर्षांत तर मुलींवरच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय. बेटी बचाओ, बेटी पढाओ असं आपल्या केंद्र सरकारचं धोरण आहे. पण आता त्याच लेकींना समाजातल्या विकृत नजरांपासून वाचवण्याची वेळ आलीय. असं का घडतंय? चिमुरड्या मुलींवर, महिलांवर अत्याचार करणारे विकृत पुरुष नेमका काय विचार डोक्यात ठेवून कुठे कुठे दबा धरून बसलेयत? कितीही ठेचलं तरी समाजात ही विकृती पुन्हा पुन्हा का उत्पन्न होते? या विकृत पुरुषांच्या घरात किंवा त्यांच्या आयुष्यात आई, बहीण, पत्नी, वहिनी आणि स्वतःची मुलगी अशी नाती नाहीचयत का? आपल्या समाजात हा अधमपणा पुन्हा पुन्हा का घडतोय? हे थांबणार कधी? आणि थांबवायचं कसं? केवळ पोेलीस आणि न्यायालय यांच्यावरच हे प्रकार थांबवण्याची जबाबदारी टाकून ते होणाराय का? आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे. मग आता आपल्याला आणखी काय करायला हवं?