(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Special Report | मुंबईतील गांजा तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश; नक्षलग्रस्त भागातून गांजाचा पुरवठा
मुंबई : मुंबई पोलिसांनी अशा एका गँगचा पर्दाफाश केला आहे, जी दर महिन्याला मुंबईत चार टन गांजाचा पुरवठा करत होती. काही लोक गांजा मुंबईत पोहोचवत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी सेलच्या घाटकोपर पथकाला मिळाली होती. यानंतर घाटकोपर युनिटने विक्रोळीजवळ मुंबई-ठाणे हायवेवर सापळा रचून एका ट्रकला अडवला. त्यात नारळ भरले होते. तपासादरम्यान समोर आलं की, आरोपींनी नारळांच्या खाली ट्रकमध्ये एक कॅविटी बनवली जात, त्यात त्यांनी 1800 किलो गांजा लपवला होता. या जप्त केलेल्या गांजाची किंमत साडे तीन कोटी रुपये आहे. मुंबई क्राईम ब्रान्चच्या सहआयुक्त मिलन भारंबे यांनी ही माहिती दिली.
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आकाश यादव आणि दिनेश सरोज या दोघांना अटक केली आहे, जे ट्रकमध्ये गांजासोबत होते. आकाश यादवविरोधात वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये तीन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात पोलीस सध्या संदीप सातपुते आणि लक्ष्मी प्रधान यांचा शोध घेत आहेत. संदीप सातपुते हा भिवंडीतील एका गोदामाचा मालक असून तो ठाण्याच्या लुईस वाडी परिसरात राहतो. तो जवळपास पाच वर्षांपासून अशाचप्रकारे गांजाचा पुरवठा करत आहे. तर प्रधान आंध्र प्रदेशचा रहिवासी असून नक्षलग्रस्त भागात आपलं नेटवर्क वापरुन सातपुतेसारख्या मोठ्या प्रमाणात गांजा घेणाऱ्या आणि वितरण करणाऱ्यांना पुरवठा करण्याचं काम करतो.
भरांबे यांच्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात समोर आलं आहे की, हे आरोपी दर महिन्याला महाराष्ट्रात सहा टन गांजाचा पुरवठ करायचे, त्यापैकी 4 टन गांजाची विक्री केवळ मुंबईत व्हायची.