Lakhimpur Kheri : आणखी कोणता पुरावा हवा? शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणारा लखीमपुरातील 'तो' व्हिडीओ समोर
लखनऊ : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने गाडीने चिरडले होते. यामध्ये आतापर्यंत नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये एक SUV गाडी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गर्दीत घुसते आणि त्यांना तशीच चिरडत पुढे निघून जाते असं दिसतंय. हा व्हिडीओ लखीमपूर खेरी या ठिकाणचा असल्याचं सांगण्यात येतंय.
जवळपास 25 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आंदोलक शेतकरी सरकार विरोधी घोषणाबाजी करत रस्त्यावरून चालले आहेत आणि मागून अचानक एक SUV कार येते आणि त्यांना चिरडून तशीच पुढे निघून जाते. पण हा व्हिडीओ लखीमपूरमधील आहे की नाही याची सत्यता उत्तर प्रदेश पोलिसांनी अद्याप तपासली नाही.
ही SUV केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या ताफ्यातील होती. या SUV मध्ये मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा हाच बसला होता असं प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितलंय.
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ते लखीमपूरचे भाजपचे खासदारही आहेत. "सुधर जाओ वरना दो मिनीट लगेंगे हमे..." अशा पद्धतीची भाषा त्यांनी शेतकरी आंदोलकांबाबत वापरली होती. रविवारी याच केंद्रीय मंत्र्याचा एक कार्यक्रम लखीमपूर होणार होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी तिथं निदर्शनं करायचा निर्णय घेतला.