Ajit Pawar Jarandeshwar Special Report : जरंडेश्वर भोवणार? Ajit Pawar यांची अडचण वाढणार?
सातारा : लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी संबधित जरंडेश्वेर साखर कारखान्याची (Jarandeshwar Sugar Factory) पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली आहे. राज्याच्या लाचलुचपत विभाग अर्थात एसीबीकडून ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. जरंडेश्वर कारखान्याची चौकशी म्हणजे अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय.
लोकसभा निवडणुकीचा चौथ्या टप्पा संपताच पुणे एसीबीकडून ही चौकशी सुरु करण्यात आली आहे. साताऱ्यातील अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर कारखान्यातील कथित गैरव्यावहार, कोरेगाव येथील एक भूखंड आणि डीस्टलरी प्रकल्पासंर्दभात ही चौकशी सुरू आहे .
जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरु झाल्याने महायुतीत सर्व आलबेल नसल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यानंतर अजित पवार यांनी महायुतीच्या प्रचाराकडे पाठ फिरवली होती. पाचव्या टप्प्यातील म्हणजे मुंबई आणि ठाणे परिसरातील लोकसभेच्या निवडणूक प्रचारापासून अजित पवारांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं.
अजित पवार हे भाजप-शिवसेनेसोबत सत्तेत गेल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला होता. ईडीने जरंडेश्वर कारखान्याची चौकशी करुन चार्जशीट दाखल करताना त्यातून अजित पवार यांचे नाव वगळले होते. मात्र आता पुन्हा एसीबीने चौकशी सुरू केल्याने खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणातील धागेदोरे कुठेपर्यंत पोहोचतात हे पाहावं लागेल. मात्र या चौकशीमुळे अजित पवार अडचणीत येणार असल्याची चर्चा आहे.