Vodafone Idea 5G: लवकरच लॉन्च होणार VIची 5G सेवा, आता तरी बदणार का कंपनीची अवस्था?
Vodafone Idea 5G: Airtel आणि Jio नंतर आता Vodafone Idea म्हणजेच Vi देखील भारतात 5G सेवा सुरू करणार आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
मुंबई : Airtel आणि Jio नंतर आता Vodafone-Idea देखील भारतात 5G सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ही कंपनी भारतात आपली 5G सेवा पुढील 6-7 महिन्यांत सुरू करू शकते. 5G शर्यतीत Vodafone-Idea च्या एंट्रीमुळे Jio आणि Airtel यांना कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
मागील अनेक महिन्यांपासून VI कंपनीची अवस्था ही फार बिकट आहे. त्यामुळे 5G सेवा लॉन्च केल्यामुळे कंपनीच्या आर्थिक स्थितीमध्ये बराच फरक पडू शकतो. तसेच 5G सेवेमुळे कंपनीच्या युजर्स रेटमध्येही बराच फरक पडण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे. दरम्यान कंपनी ही सेवा कधीपर्यंत लॉन्च केली जाईल, तसेच याचा ग्राहकांना किती फायदा होणार याविषयी सिवस्तर जाणून घेऊयात.
Vi ची 5G सेवा कधी सुरू होईल?
Vodafone-Idea ने 5G सेवा सुरू करण्यास बराच उशीर केला आहे, कारण भारतात त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी Jio आणि Airtel आहेत आणि या दोन्ही कंपन्या गेल्या अनेक महिन्यांपासून देशात 5G सेवा चालवत आहेत. दरम्यान हळूहळू त्यांच्या या सेवेचा विस्तार देखील करण्यात येतोय. Jio आणि Airtel गेल्या अनेक महिन्यांपासून वापरकर्त्यांना त्यांच्या काही खास प्लॅनसह अमर्यादित 5G सेवा मोफत वापरण्याची संधी देत आहेत आणि अलीकडेच या कंपन्यांनी घोषणा केली होती की आता ते त्यांची मोफत 5G सेवा बंद करणार आहेत आणि नवीन 5G योजना लॉन्च करणार आहेत.
अशा परिस्थितीत व्होडाफोन-आयडिया कंपनी या शर्यतीत खूप उशिरा आली आहे, परंतु तरीही 5G सेवा त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरु शकते. कारण 4G सेवेच्या बाबतीत जिओ आणि एअरटेलने व्होडाफोन आयडियाला खूप मागे टाकले आहे. तसेच युजर्सला देखील VI च्या सेवा काहीश्या आवडल्या नसल्याच्या देखील प्रतिक्रिया समोर आल्यात.
Vi चा नेमका प्लॅन काय?
आता Vi 5G सेवा सुरू करणार आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, ही घोषणा Vi चे मुख्य कार्यकारी अक्षय मुंद्रा यांनी केली आहे. ते म्हणाले की, आम्ही 6 ते 7 महिन्यांत 5G सेवा सुरू करण्याचा विचार करत आहोत. तसेच Vi ने अद्याप याबाबत कोणतीही तपशीलवार माहिती दिलेली नाही. अक्षय मुंद्रा म्हणाले की,5G सुरु करण्यापूर्वी आम्हाला त्याविषयीची संपूर्ण तयारी करावी लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या टेक्नॉलॉजी भागीदारांसोबत काम करत आहे. भारतात 5G सेवा आणण्यासाठी Vi कडून स्ट्रॅटेजी प्लॅनिंग सुरु केलीये.
याशिवाय, Vi ने आपल्या सेवा सुव्यवस्थित करण्यासाठी अनेक धोरणात्मक पावले उचलली आहेत. या धोरणांतर्गत, त्यांनी 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, मुंबई आणि कोलकाता या प्रमुख भागात 3G सेवा बंद केल्या आहेत. या व्यतिरिक्त, ही कंपनी इतर सर्कलमधील 3G सेवा हळूहळू बंद करण्याच्या तयारीत आहे. आर्थिक वर्ष 2025 पर्यंत देशातून आपली 3G सेवा पूर्णपणे बंद करण्याची कंपनीची योजना आहे.