(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tech News: फोन चोरीला गेल्यास आधी करा 'ही' गोष्ट; त्यानंतर करा पोलीस तक्रार
आपल्या फोनमध्ये काही वैयक्तिक आणि आर्थिक गोष्टी असतात, त्यामुळे फोन चोरीला गेला हे कळल्यानंतर तातडीने काही गोष्टी केल्या पाहिजे.
Tech News: आजकाल फोन चोरी (Phone Snatching) ही गोष्ट सामान्य झाली आहे. चालताना तुमचा फोन चोरीला गेला की आपण घाबरुन जातो आणि काहीच करता येत नाही. फोन चोरीला गेला हे कळताच सगळं सुचेनासं होतं, फोन नक्की कोणत्या ठिकाणाहून गायब झाला? किंवा केव्हा गायब झाला असावा? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात आणि आपण गोंधळून जातो.
पण तुमचा किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचा फोन चोरील गेल्यास तुम्ही काय कराल? तुम्ही विचार करत असाल की सर्वप्रथम तुम्ही पोलिसात जाल. हो, ते बरोबर आहे. पण तरीही पोलिसांकडे जाण्यापूर्वी एक गोष्ट आहे, जी तुम्ही सर्वात आधी केली पाहिजे. त्याबदद्ल आज जाणून घेऊया.
फोन चोरीला गेल्यास काय करावं?
जर तुमचा फोन चोरीला गेला असेल तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या टेलिकॉम ऑपरेटरला कॉल करा आणि तुमचे सिम ब्लॉक करा. कारण आज तुमचे बँक खाते आणि प्रत्येक तपशील तुमच्या फोन नंबरशी जोडलेला आहे. अशा स्थितीत फोन चोरणारी व्यक्ती तुमच्या नंबरद्वारे तुमचे मोठे आर्थिक नुकसान करू शकते. त्यामुळे सर्वप्रथम तुमचे सिम बंद करा, त्यानंतर लगेच पोलिसांशी संपर्क साधा.
पोलिसांशी संपर्क साधताना काय करावं?
जेव्हाही तुमचा फोन हरवतो, तेव्हा सर्वप्रथम तुमचा फोन चोरीला गेला आहे की तो हरवला आहे हे नक्की ठरवा. कारण, पोलीस हरवलेल्या फोनवर हरवल्याची तक्रार घेतात आणि जर फोनची चोरी झाली असेल तर एफआयआर नोंदवून घेतात. त्यामुळे जेव्हाही तुम्ही पोलिसांकडे जाल, तेव्हा सर्वप्रथम तुमच्या फोनचं नक्की काय झालं ते ठरवा.
फोन चोरी झाल्यानंतरची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
फोन चोरीला गेल्यास सर्वप्रथम पोलिसात एफआयआर नोंदवा. तुम्ही ऑफलाइन किंवा ऑनलाइन एफआयआर नोंदवू शकता. यानंतर, तुम्ही एफआयआरची प्रत आणि तक्रार क्रमांक जरुर घ्यावा. त्यानंतर तुम्हाला सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर म्हणजेच CEIR वेबसाइट ceir.gov.in वर जावे लागेल. वास्तविक, CEIR कडे देशातील प्रत्येक फोनचा डेटा असतो, जसे की फोनचे मॉडेल, सिम आणि IMEI नंबर.
चोरीचे मोबाईलही येथून सहज शोधता येतात. ceir.gov.in ला भेट दिल्यानंतर तुम्हाला Block/Lost Mobile, Check Request Status आणि Un-Block Found Mobile असे तीन पर्याय दिसतील. येथे तुम्हाला तुमचा चोरीला गेलेला फोन ब्लॉक करण्यासाठी Stolen/Lost Mobile पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यावर क्लिक करताच एक पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलचे डिटेल्स टाकावे लागतील. येथे तुम्हाला मोबाईल नंबर, IMEI नंबर, डिव्हाइस ब्रँड, कंपनी, फोन खरेदीचे invoice, फोन हरवल्याची तारीख आणि इतर माहिती नोंदवावी लागेल.
हेही वाचा:
Facts: झोपेत झटके का लागतात? उंचावरून पडत असल्याचा आभास का होतो? 'हे' आहे त्यामागचं कारण