First Made In India Chip : आता पहिल्या मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिपची निर्मिती होणार, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा
First Made In India Chip : अमेरिकन चिप निर्माती कंपनी मायक्रोन भारतात मोठी गुंतवणूक करणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात भारत सेमीकंडक्टरचे मोठं केंद्र ठरू शकतो.
First Made In India Chip : अमेरिकन चिप निर्माती कंपनी मायक्रॉन भारतात मोठी गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे येत्या काळात भारत सेमीकंडक्टर चिप निर्मिती करणारं हब ठरू शकतो. कारण मायक्रॉनने भारतातील गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्पाची उभारणी (micron technology chip plant in India) करणार आहे. यामुळे हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यासोबत येणाऱ्या काही वर्षात ऑटो, इलेक्ट्रिक गाड्या, लॅपटॉप, मोबाईल आणि आयटी क्षेत्रात मोठी आर्थिक उलाढाल होईल.
या प्रकल्पामुळे तूर्त 5,000 हजार लोकांना रोजगार मिळेल, तर प्रकल्प उभारल्यानंतर 1500 ते 2000 हजार लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाविषयी सोमवारी, केंद्रीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी सांगितले की, अमेरिकन मायक्रॉन टेक्नॉलॉजी कंपनी गुजरातमध्ये आपल्या सेमीकंडक्टर (Semiconductor) प्रकल्पाची उभारणी करणार आहे. ते पुढे म्हणाले की, या प्रकल्पामुळे भारतात पहिल्या मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिपची निर्मिती होईल. येत्या 18 महिन्यात या चिपचं उत्पादन तयार करण्यात येईल. मंत्री वैष्णव यांनी सांगितले की, गुजरातमध्ये होणारा मायक्रॉनचा हा प्रकल्प भारतातील आधुनिक सेमीकंडक्टर प्रकल्प असेल. यामुळे देशातील सेमीकंडक्टर इकोसिस्टमच्या विस्तारासाठी मोठा हातभार लागणार आहे.
सेमीकंडक्टर क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी
बिजनेस टुडेच्या एका बातमीनुसार, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, मायक्रॉन ही जगभरातील मोबाईल, लॅपटॉप, सर्व्हर, संरक्षण उपकरणे, कॅमेरा, इलेक्ट्रिक वाहने, ट्रेन, कार आणि दूरसंचार उपकरणांमध्ये उपयोग करण्यात येणाऱ्या सेमीकंडक्टरच्या उत्पादन क्षेत्रातील सर्वात मोठी पाचवी कंपनी आहे. ते पुढे म्हणाले की, गेल्या चार दशकात देशानं सेमीकंडक्टर तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे.
रोजगार निर्मितीला मिळेल चालना
या प्रकल्पाविषयी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितलं की, नुकतंच मायक्रॉनने भारतात प्रकल्पाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारतामध्ये सेमीकंडक्टर इकोसिस्टमला चालना मिळेल. ते पुढे म्हणाले की, यामुळे प्रत्यक्ष 5,000 हजार लोकांना रोजगार मिळेल आणि 500 नवीन हायटेक इंजिनिअरिंगच्या नोकऱ्या निर्माण होतील. भारताने गेल्या 18 महिन्यात सेमीकंडक्टर उद्योगात प्रचंड प्रगती केली आहे. तसेच अमेरिकन कंपन्यांनी केलेल्या घोषणांमुळे भारतात स्टार्टअपला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
मायक्रॉन 825 मिलियन डॉलरची करेल गुंतवणूक
नुकतचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत मायक्रॉन कंपनीचे सीईओ संजय मेहरोत्रा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मेहरोत्रांना भारतात सेमीकंडक्टरच्या निर्मितीला चालना देण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. यानंतर काही तासानंतर मायक्रॉनने गुजरातमध्ये 825 मिलियन डॉलरची गुंतवणूक आणि सोबत एका नवीन असेंब्ली आणि टेस्टिंग सुविधा तयार करण्यासाठी योजनेची घोषणा केली आहे. याचा मुख्य उद्देश देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारापेठांना सेवा देण्यासाठी आहे. कंपनीने सांगितले की, नवीन असेंब्ली आणि टेस्टिंग सुविधा 2023 मध्येच टप्प्याटप्प्यानं सुरू होण्याची शक्यता आहे. 2024 च्या अखेरीस 5,00,000 चौरस फूट जागेसह प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला सुरूवात होईल. तर लवकरच प्रकल्पाचा दुसरा टप्पाही सुरू करण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा :
Micron Investment : रोजगाराच्या संधी वाढणार! केंद्राकडून सुमारे 300 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी