एक्स्प्लोर
पैलवान योगेश्वर दत्तचा सुवर्णपदकाचा निर्धार!
मुंबईः भारताचा अनुभवी पैलवान योगेश्वर दत्त रिओ ऑलिम्पिकमध्ये यंदा चौथ्यांदा सहभाही होतोय आणि या अखेरच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा निर्धार त्याने केला आहे.
लंडन ऑलिम्पिकचा कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्तकडून भारताला रिओमध्येही पदकाची आशा आहे. ऑलिम्पिकच्या अखेरच्या दिवशी योगेश्वर 65 किलो वजनी गटाच्या लढतीत खेळायला उतरणार आहे. त्याला सलामीला मंगलोयाच्या गांझोरिगचा सामना करायचा आहे.
योगेश्वरला तगड्या अनुभवाची साथ
योगेश्वरने हा सामना जिंकला, तर तो उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल होईल. योगेश्वरला मग रशियाच्या रामोनोव्ह सोसलानसारख्या तगड्या मल्लांचा सामना करावा लागू शकतो. ते आव्हान पार केलं तरंच योगेश्वरला सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची संधी मिळेल.
याआधी केवळ पैलवान सुशीलकुमारनेच कुस्तीत सलग दोन ऑलिम्पिक पदकं मिळवली होती. योगेश्वरला आता तीच कामगिरी खुणावते आहे. योगेश्वर रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेला भारताचा सर्वात अनुभवी पैलवान आहे. त्याच्या पाठीशी तीन ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचा अनुभव आहे.
मेहनती आणि जिद्दी पैलवान अशी ख्याती
योगेश्वर दत्तचं नाव चार वर्षांपूर्वी लंडन ऑलिम्पिकमधल्या कांस्यपदकानंतर देशात घरोघरी पोहोचलं. पण कुस्तीप्रेमींसाठी योगेश्वर नवा नाही. लंडनमध्ये 2003 साली राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून योगेश्वरने जगाला आपली दखल घ्यायला लावली. कारकीर्दीच्या सुरूवातीला केप टाऊनमध्ये झालेल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत योगेश्वरने 60 किलो वजनी गटात फ्रीस्टाईल कुस्तीचं सुवर्ण आणि ग्रीको रोमन कुस्तीत रौप्यपदक पटकावलं. कुस्तीच्या या दोन्ही प्रकारांत प्राविण्य मिळवणाऱ्या मोजक्या भारतीयांमध्ये योगेश्वरची गणना होते.
मेहनती, कणखर आणि जिद्दी अशी योगेश्वरची ओळख आहे. 2006 साली दोहा एशियाडआधीच योगेश्वरच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यात गुडघ्याच्या दुखापतीनं ग्रासलेलं असतानाही त्याने कांस्यपदकाची कमाई केली.
योगेश्वरच्या पदरी 2008 साली बीजिंग ऑलिम्पिकमध्ये निराशाच पडली. पण 2010 साली दिल्लीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावलं. लंडन ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या 60 किलो वजनी गटात योगेश्वरनं कांस्यपदक मिळवलं. त्यावेळी आपल्या खास शैलीत म्हणजे मुळी डाव टाकून त्याने दक्षिण कोरियाच्या रि ज्योंग मियोन्गला धूळ चारली होती.
ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचं पदक जिंकणारा योगेश्वर हा खाशाबा जाधव आणि सुशीलकुमार नंतरचा तिसराच भारतीय पैलवान ठरला. योगेश्वरला 2012 साली खेलरत्न पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं.
हरियाणाच्या सोनिपत जिल्ह्यातल्या गोहाना गावाचा योगेश्वर वयाच्या आठव्या वर्षी आपल्याच गावातल्या बलराज पैलवानाला पाहून कुस्तीच्या आखाड्यात उतरला होता. गेल्या 25 वर्षांत त्यानं मारलेली मजल देशभरातल्या पैलवानांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement