दिप्तीची गुगली अन् हरमनप्रीत-ऋचाची फटकेबाजी; भारताचा विंडिजवर सहा विकेट्सने विजय
IND vs WI, WT20: टी 20 विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिज संघाचा सहा गडी आणि 11 चेंडू राखून पराभव केला.
IND vs WI, WT20: टी 20 विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिज संघाचा सहा गडी आणि 11 चेंडू राखून पराभव केला. विंडिजने दिलेलं 119 धावांचे आव्हान भारताने चार विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. दिप्ती शर्माला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. दिप्तीने चार षटकात 15 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट्स घेतल्या होत्या. त्याशिवाय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि ऋचा घोष यांनी मोक्याच्या क्षणी भागिदारी करत भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेत उपांत्य फेरीच्या दिशेन आणखी एक पाऊल टाकले आहे. वेस्ट इंडिजच्या संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. या पराभवामुळे वेस्ट इंडिजच्या संघाच्या उपांत्य फेरीत पोहचण्याची वाट आणखी खडतर झाली.
स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी ताबोडतोड सुरुवात करुन दिली. पहिल्या दोन षटकांत धावांचा पाऊस पाडला. पण चौथ्या षटकात स्मृतीला बाद करत विडिंजने पहिले यश मिळवले. त्यानंतर जेमिमा आणि शेफाली वर्माही लागोपाठ बाद झाल्या. 40 धावांत भारताने तीन विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर कर्णधार हरमनप्रीतने ऋचा घोष हिच्यासोबत भारताचा डाव सावरला. हरमनप्रीतने 33 धावांची खेळी केली. तर ऋचा घोष हिने नाबाद 44 धावांची खेळी केली.
विडिंजची 118 धावांपर्यंत मजल -
प्रथम फलंदाजी करताना विडिंजने 20 षटकात सहा बाद 118 धावा केल्या. स्टॅफनी टेलर हिने 42 तर शेमेन कँपबेल 30 धावा केल्या. त्याशिवाय शबिका गजनबी 15 आणि सी नेशन हिने 21 धावांची खेळी केली. भारताकडून दिप्ती शर्माने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. वेस्ट इडिजची कर्णधार हेले मॅथ्यूज हिने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पूजा वस्त्राकर हिने पहिल्याच षटकात धक्का देत हेले मॅथ्यूजला बाद केले. पण त्यानंतर स्टॅफनी टेलर आणि शेमेन कँपबेल यांनी भागादारी करत वेस्ट इंडिजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी अर्धशतकी भागिदारी करत डाव सावरला. पण दिप्तीने एकाच षटकात दोघींना बाद करत विडिंजला बॅकफूटवर ढकलले. वेस्ट इंडिजच्या इतर फलंदाजांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही.
14 आणि 15 व्या षटकात वेस्ट इंडिजचा संघ बॅकफूटवर ढकलला गेला. दिप्ती शर्माने आधी एकाच षटकात दोन विकेट घेतल्या. त्यानंतर दबावात आलेल्या विडिंज फलंदाजाने धावबाद होत आपली विकेट फेकली. दिप्ती शर्माने वेस्ट इंडिजला लागोपाठ दोन धक्के देत बॅकफूटवर ढकलले. दिप्तीने शेमेन कँपबेल हिला बाद करत आधी जमलेली जोडी फोडली होती. त्यानंतर लगेच स्टॅफनी टेलर हिला बाद करत विडिंजला तिसरा धक्का दिला. दिप्तीने एकाच षटकात दोन विकेट घेत भारताला सामन्यात वरचढ केले. त्यानंतर दबावात आलेल्या विडिंजच्या फलंदाजाने धावबाद होत विकेट फेकली. त्यानंतर एकापाठोपाठ एक विकेट पडत गेल्या. विडिंजने सहा गड्यांच्या मोबदल्यात 118 धावांपर्यंत मजल मारली.