(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs NZ Warm-Up: आज टीम इंडियाचा दुसरा सराव सामना, न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार, कधी-कुठे पाहाल सामना?
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज टी20 विश्वचषकातील सराव सामना पार पडणार असून भारताने पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता.
IND vs NZ : भारतीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आज अर्थात 19 ऑक्टोबर रोजी टी20 विश्वचषकातील (T20 World Cup) वॉर्मअप अर्थात सराव सामना खेळवला जाणार आहे. भारताने पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाला मात दिली असून त्यानंतर आज न्यूझीलंडवर विजयासाठी मैदानात उतरणार आहे. सराव सामने विश्वचषकाच्या दृष्टीनं महत्त्वाचे असल्याने दोन्ही संघ विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करतील. तर आजच्या सामन्याबद्दलची महत्त्वाची माहिती जाणून घेऊ...
कधी आहे सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील हा सराव सामना आज अर्थात 19 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामना सुरु होईल. त्याआधी अर्धातास नाणेफेक होणार आहे.
कुठे आहे सामना?
हा सामना ब्रिस्बेनच्या गाबा क्रिकेट स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडलेल्या सराव सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर राहुल आणि सूर्या दोघांनी अर्धशतकं झळकावत अनुक्रमे 57 आणि 50 धावा केल्या. दिनेशनं 20 धावांची फिनिशिंग दिल्याने भारताची धावसंख्या 186 पर्यंत पोहोचली. 187 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर मिचेल मार्श आणि आरॉन फिंच यांनी कमाल सुरुवात केली. 35 धावा करुन मार्श बाद झाला पण कॅप्टन फिंच क्रिजवर कायम होता. स्मिथ आणि मॅक्सवेलनं प्रत्येकी 11 आणि 23 धावा केल्या, पण त्या दोघानंतर इतर फलंदाजांना दुहेरी संख्याही गाठता आली नाही. फिंचनं अर्धशतक झळकावून संघाला विजयाच्या दिशेने नेण्याचा संपूर्ण प्रयत्न केला. पण 19 व्या ओव्हरमध्ये हर्षलनं त्याला 76 धावांवर बाद केलं आणि भारताच्या विजयाच्या आशा जिवंत झाल्या. त्यानंतर शेवटची ओव्हर टाकण्यासाठी शर्मानं प्लेईंग 11 मध्ये नसणाऱ्या मोहम्मद शमीला मैदानात बोलवलं आणि शमीने कमाल करत सामना भारताला जिंकवून दिला. शमीने पहिल्या दोन चेंडूवर प्रत्येकी दोन धावा दिल्यानंतर अखेरच्या चारही चेंडूत विकेट्स मिळवल्या. यातील एक विकेट रनआऊट असल्यानं शमीची हॅट्रीक हुकली पण त्यानं सामना भारताला 6 धावांनी जिंकवून दिला.
हे देखील वाचा-
- IPL 2023: रवींद्र जाडेजा चेन्नईच्या संघाची साथ सोडणार? आयपीएल 2023च्या ऑक्शनपूर्वी महत्वाची माहिती