(Source: ECI/ABP News/ABP Majha)
T20 WC Practice Match India : मिशन वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियात भारताची विजयी सुरुवात, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया 11 वर भारताचा विजय
T20 World Cup 2022: आगामी टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पोहचला असून भारताने सराव सामने खेळण्यासही सुरुवात केली आहे.
T20 World Cup 2022 : भारतीय संघ टी20 विश्वचषक 2022 (ICC T20 World Cup 2022) खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया येथे पोहोचला आहे. 16 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषकाचे सामने सुरु होणार असून सध्या भारत सराव सामने खेळत आहे. आज झालेल्या भारत विरुद्ध वेस्टर्न ऑस्ट्रेलिया 11 या सराव सामन्यात भारताने 13 धावांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलियात विजयी सुरुवात केली आहे. सामन्यात भारतासाठी फलंदाजीमध्ये सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) तर गोलंदाजीत अर्शदीप सिंहने (Arshdeep Singh) चमकदार कामगिरी केली आहे.
सामन्यात आधी फलंदाजी करत टीम इंडियाने 20 षटकांत 6 विकेट गमावत 158 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 145 धावा करू शकला. ज्यामुळे भारत 13 धावांनी विजयी झाला. भारताकडून सूर्यकुमारने अवघ्या 35 चेंडूत 52 धावा करत दमदार अर्धशतक झळकावलं. त्याचवेळी हार्दिक पांड्याने देखील महत्त्वपूर्ण अशा 29 धावा केल्या. याशिवाय दीपक हुडाने 22 आणि दिनेश कार्तिकने 19 धावांचे योगदान दिले. विशेष म्हणजे या सामन्यात रोहित शर्मासोबत ऋषभ पंत फलंदाजीला आला. पण दोघेही स्वस्तात माघारी परतले रोहितने 3 तर पंतने 9 रन केले. गोलंदाजीत अर्शदीपने कमाल कामगिरी केली. त्याने एकूण 3 विकेट्स घेतले. तर भुवनेश्वरनंही दोन विकेट्स घेतल्या. भारताकडून विराट कोहली संघात नसून त्याला विश्रांती देण्यात आली होती.
कसे असेल भारताचे सराव सामन्याचे वेळापत्रक?
विश्वचषक खेळणारे बहुतेक संघ द्विपक्षीय मालिका खेळत आहेत. आगामी टी-20 विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी भारत काही सराव सामने खेळणार आहे. भारत 10 ऑक्टोबर आणि 13 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया इलेव्हनशी भिडणार आहे. त्यानंतर भारतीय संघ ब्रिसबेन येथे जातील, जिथे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याशी अनुक्रमे 17 ऑक्टोबर आणि 19 ऑक्टोबरला दोन अधिकृत सराव सामने खेळतील.
ऑस्ट्रेलियाच्या या प्रमुख शहरात रंगणार टी-20 विश्वचषक स्पर्धा
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल.
हे देखील वाचा-