World Cup 2023 : विश्वचषकाच्या पदार्पणात शतक, सर्वात वेगवान धावांचा पाठलाग, पहिल्याच सामन्यात रेकॉर्डचा पाऊस
Devon Conway and Rachin Ravindra: विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या विकेटसाठी 273 धावांची भागीदारी केली.
मुंबई : सलामीचा डेवॉन कॉनवे (Devon Conway ) आणि रचिन रवींद्रनं (Rachin Ravindra) झळकावलेल्या खणखणीत नाबाद शतकांच्या जोरावर न्यूझीलंडनं (New Zeeland) आयसीसी वनडे विश्वचषकात दणदणीत विजयी सलामी दिली. न्यूझीलंडनं सलामीच्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा (England) नऊ विकेट्स आणि 82 चेंडू राखून धुव्वा उडवला. न्यूझीलंडनं या विजयासह गत विश्वचषकाच्या फायनलमधल्या तांत्रिक पराभवाचा वचपा काढला.
आजच्या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडला नऊ बाद 282 धावांत रोखलं होतं. त्यानंतर डेवॉन कॉनवे आणि रचिन रवींद्रनं दुसऱ्या विकेटसाठी 273 धावांची अभेद्य भागीदारी रचून न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. कॉनवेनं 19 चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 152 धावांची, तर रवींद्रनं 11 चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 123 धावांची खेळी उभारली. त्याआधी, न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीनं तीन, तर मिचेल सॅन्टनर आणि ग्लेन फिलिप्सनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
न्यूझीलंडसाठी सर्वात मोठी भागीदारी
कॉनवे आणि रवींद्र यांनी 273 धावांची भागीदीरी केली. ही भागीदारी न्यूझीलंडसाठी वनडेमधील सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. याआधी हा विक्रम मार्टिन गप्टिल आणि विल यंग यांच्या नावावर होता. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी 203 धावाची भागीदारी केली होती. पण त्यांचा हा विक्रम कॉनवे आणि रवींद्रच्या जोडीने मोडीत काढला आहे.
न्यूझीलंडचा विक्रम
डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांची 273 धावांची भागीदारी ही न्यूझीलंडसाठी वनडे विश्वचषकातील सर्वात मोठी भागीदारी ठरली. यापूर्वी हा विक्रम ली जर्मन आणि ख्रिस हॅरिसच्या नावावर होता, ज्यांनी 1996 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 168 धावांची भागीदारी केली होती. विश्वचषकात इंग्लंडसाठी सर्वात मोठी भागीदारी ठरली होती.
आतापर्यंत झालेला विक्रम
273 धावा- डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र विरुद्ध इंग्लंड: अहमदाबाद, 2023
168 धावा- ली जर्मन आणि ख्रिस हॅरिस विरुद्ध ऑस्ट्रेलिया: चेन्नई, 1996
166 धावा- ब्रेंडन मॅक्युलम आणि मार्टिन गप्टिल विरुद्ध झिम्बाब्वे: अहमदाबाद, 2011
160 धावा- केन विल्यमसन आणि रॉस टेलर विरुद्ध वेस्ट इंडिज: मँचेस्टर, 2019
149 धावा- ग्लेन टर्नर आणि जॉन पार्कर विरुद्ध पूर्व आफ्रिका: बर्मिंगहॅम, 1975.
एकदिवसीय विश्वचषकातील चौथी सर्वात मोठी भागीदारी
कॉनवे आणि रवींद्रची 273 धावांची भागीदारी एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासातील चौथी सर्वोच्च भागीदारी ठरली. विश्वचषकातील सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम वेस्ट इंडिजच्या मार्लन सॅम्युअल्स आणि ख्रिस गेल यांच्या नावावर आहे, ज्यांनी 2015 विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात दुसऱ्या विकेटसाठी 372 धावांची भागीदारी केली होती.
न्यूझीलंडकडून विश्वचषकात पदार्पणातच शतक
न्यूझीलंडच्या ज्या खेळाडूंनी विश्वचषक पदार्पणात शतके झळकावली आहेत त्यांच्या यादीमध्ये आता कॉनवे आणि रचिन रवींद्र यांच्या देखील नावाचा समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत न्यूझीलंडच्या या खेळाडूंनी विश्वचषकाच्या पदार्पणात शतकाची कामगिरी केलीये.
1975 : ग्लेन टर्नर
1996 : नॅथन अॅस्टल
2003 : स्कॉट स्टायरिस
2023 : डेव्हॉन कॉन्वे
2023 : रचिन रवींद्र.
लक्ष्याचा सर्वात वेगाने पाठलाग करणारा संघ
डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांच्या भागीदारीमुळे सर्वात जलद 280 हून अधिक धावांचे लक्ष्य गाठणार संघ बनला आहे.
हेही वाचा :
World Cup 2023 : यंदाचा वर्ल्डकप न्यूझीलंड जिंकणार, अजब योगायोग आला जुळून