World Cup 2023 : तेरी हार में मेरी जीत है! पाकिस्तानसाठी अजूनही सेमीफायनलचे गणित कायम! भारताकडून इंग्लंडच्या पराभवाचा फायदा
World Cup 2023 : विश्वचषकात पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे. त्यासाठी पाकिस्तान संघाला उर्वरित तीन सामने जिंकावे लागतील आणि त्यासोबतच इतर संघांच्या कामगिरीवरही अवलंबून राहावं लागणार आहे.
ODI World Cup 2023 : विश्वचषकात (World Cup 2023) टीम इंडिया (Team India) ने गतविजेत्या इंग्लंड (England) वर दणदणीत विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडची फलंदाजी पुरती कोलमडली. यंदाच्या विश्वचषकात टीम इंडियाने सलग सहाव्या विजय मिळवला. लखनौच्या इकाना स्टेडिअमवर भारतीय संघाने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला. भारताने 229 धावांच्या आव्हानाचा धडक गोलंदाजीसह बचाव केला. टीम इंडियाच्या गोलंदाजांननी इंग्लंडचा संपूर्ण संघ 129 धावांत गारद केला. रोहित शर्माच्या अर्धशतकानंतर मोहम्मद शामी आणि जसप्रीत बुमराह यांनी भेदक मारा केला. शामीने चार तर बुमराहने तीन विकेट घेतल्या. या विजयासह टीम इंडियाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलेय. इंग्लंडचा विश्वचषकातील पाचवा पराभव होय. या पराभवासह इंग्लंडचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलेय.
भारताकडून इंग्लंडच्या पराभवाचा फायदा पाकिस्तानला
पाकिस्तान क्रिकेट संघाचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न जवळपास भंगलं आहे, कारण त्यांच्या संघाला सहा पैकी फक्त दोन सामने जिंकता आले आहेत, तर गेल्या चार सामन्यांमध्ये सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा स्थितीत पाकिस्तान क्रिकेट संघाला उपांत्य फेरी गाठणे फार कठीण वाटत असले तरी हे अशक्य नाही. आता पाकिस्तान क्रिकेट संघाला उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे. त्यासाठी पाकिस्तान संघाला उर्वरित तीन सामने जिंकावे लागतील आणि त्यासोबतच इतर संघांच्या कामगिरीवरही अवलंबून राहावं लागणार आहे.
पाकिस्तान उपांत्य फेरीत कसा पोहोचेल?
पाकिस्तानचे क्रिकेट चाहते आता भारतीय संघाने उर्वरित सामने जिंकण्यासाठी प्रार्थना करतील, कारण भारताने आपले उर्वरित सामने असेच जिंकले तर पाकिस्तान संघासाठी उपांत्य फेरीचा मार्ग सुकर होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याचाही पाकिस्तानला फायदा झाला आहे. टीम इंडियाने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला, त्यामुळे पाकिस्तान संघ आणि चाहते खूप आनंदी झाले आहेत, कारण आता इंग्लंडला उपांत्य फेरी गाठणं जवळपास अशक्य झालं आहे. विश्वचषकातील इंग्लंडचं आव्हान जवळपास संपलं आहे. आता मोठा करिष्माच इंग्लंडला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवू शकतो. त्यासाठी इंग्लंड संघाला त्यांचे उर्वरित तीन कठीण सामने जिंकावे लागतील. इंग्लंडचा सामना आता ऑस्ट्रेलिया, नेदरलँड आणि पाकिस्तानशी होणार आहे.
पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी ीसमीकरण काय?
भारताविरुद्धच्या सामन्यातील इंग्लंडच्या पराभवाचा फायदा भारतासोबतच पाकिस्तानलाही झाला आहे. पाकिस्तान संघासाठी उपांत्य फेरीच्या शर्यतीत जितके कमी उमेदवार असतील, तितकी चांगली संधी आणि जास्त फायदा होईल. इंग्लंडचा संघ 100 धावांच्या फरकाने हरला तर त्यांचा निव्वळ धावगतीही कमी होईल. अशा परिस्थितीत पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठायची संधी मिळेल, तर पाकिस्तानला त्यांचे उर्वरित तीन सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. पाकिस्तानचे पुढील तीन सामने बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध होणार आहेत. अशा परिस्थितीत, पाकिस्तानला तीन सामने चांगल्या फरकाने जिंकावे लागतील, ज्यामुळे त्यांचे एकूण दहा गुण होतील आणि निव्वळ धावगती देखील सुधारेल. याशिवाय भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने आपले उर्वरित सर्व सामने जिंकावेत यासाठीही पाकिस्तानला प्रार्थना करावी लागेल. असं झालं तरंच पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे.