(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS : हा कसला माज? वर्ल्ड कप ट्रॉफीवर पाय ठेवणार मिचेल मार्श म्हणतोय, ''त्यात एवढं काय? मी पुन्हा तेच करणार''
Mitchell Marsh Reaction : विश्वचषक ट्रॉफीवर पाय ठेवण्याच्या वादावर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिचेल मार्शनं मौन सोडलं आहे. तो म्हणाला की, ''यामध्ये काय मोठी गोष्ट आहे, मी पुन्हा तसंच करेन''.
World Cup 2023, India vs Australia : भारताचा (Team India) पराभव करत ऑस्ट्रेलियाने क्रिकेट विश्वचषक 2023 (ICC ODI World Cup 2023) जिंकला. विश्वचषकाच्या फायनलमध्ये (World Cup 2023 Final) भारताचा पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंनी वर्ल्ड कप ट्रॉफीसह आनंद साजरा केला. यावेळी ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल मार्शचा (Mitchell Marsh) ट्रॉफीवर (Trophy) पाय ठेवून बसलेला फोटो व्हायरल (Viral Photo) झाला. यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं. दरम्यान मिशेल मार्शने या व्हायरल फोटोवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे. मिशेल मार्शची प्रतिक्रिया ऐकून भारतीय चाहत्यांचं रक्त मात्र पुन्हा खवळलं आहे.
वर्ल्ड कप ट्रॉफीवर पाय ठेवणाऱ्या मिचेल मार्शची पहिली प्रतिक्रिया
विश्वचषक 2023 विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू मिचेल मार्शचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो वर्ल्ड कप ट्रॉफीवर पाय ठेवून बसलेला दिसत होता. या फोटोवरून चांगलाच गदारोळ झाला. त्याचं असं वागणं अनेक भारतीय चाहत्यांना आवडलेलं नाही. चाहत्यांव्यतिरिक्त भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेही मार्शच्या त्या फोटोमुळे दु:ख झाल्याचं सांगितलं आहे. एका चाहत्याने तर पंतप्रधान कार्यालयाला (PMO) आणि क्रीडा मंत्रालयाला पत्र लिहून भारतात मार्श खेळण्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.
मी पुन्हा तेच करेन : मिशेल मार्श
दरम्यान, या गदारोळावर मार्शने पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या SEN रेडिओ नेटवर्कच्या मुलाखतीत ऑस्ट्रेलियन खेळाडू मिशेल मार्शला विचारलं गेलं की तो पुन्हा असं करेल का, तेव्हा त्याने हो असं उत्तर दिलं आहे. यावेळी मार्शनं म्हटलं की, ''खरं सांगायचं तर, कदाचित होय.''
'त्यात एवढं काय'
त्या फोटोमध्ये एवढं काही नाही, असंही मार्श म्हणाला आहे. ''यात कोणती मोठी गोष्ट नाही. त्या फोटोत कोणत्याही प्रकारचा अपमान नाही'', असं मार्शनं म्हटलं आहे. मार्श म्हणाला की, ''त्याने याचा फारसा विचारही केला नाही. सोशल मीडियावरही हा मुद्दा जास्त दिसलं नाही.'' वर्ल्ड कप फायनलनंतर मार्श ऑस्ट्रेलियाला परतला, तर ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात थांबले.
मालिकेमुळे ऑस्ट्रेलियाचं सेलिब्रेशन रखडलं
मार्शनं सांगितलं की, या भारताविरुद्धच्या मालिकेमुळे ऑस्ट्रेलियाचं सेलिब्रेशन झालं नाही. ज्या खेळाडूंना मालिकेसाठी थांबावं लागलं, त्यांच्यासाठी हे थोडे वाईट आहे, पण ते सर्व ऑस्ट्रेलियासाठी खेळत आहेत आणि भारताविरुद्धची मालिका खूप मोठी आहे, याचा आदर केला पाहिजे, असंही मार्शनं म्हटलं आहे.