विराट कोहली ठरला आयसीसीचा दशकातला 'सर्वोत्तम पुरुष' आणि 'वन डे क्रिकेटर'!
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला दशकाचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे. या दशकात कोहलीने फलंदाजीमध्ये 20,396 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 66 शतके आणि 94 अर्धशतकांचा समावेश होता.
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा आयसीसीचा गेल्या दशकातला सर्वोत्तम पुरुष क्रिकेटर ठरला आहे. गेल्या दशकातल्या सर्वोत्तम वन डे क्रिकेटर पुरस्काराचा मानही विराट कोहलीलाच देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या गेल्या दशकातल्या कामगिरीच्या निकषावर आयसीसीनं तिन्ही फॉरमॅट्समधल्या सर्वोत्तम पुरस्कारांची आज घोषणा केली.
आयसीसीचा दशकातला सर्वोत्तम पुरुष क्रिकेटर पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या विराट कोहलीनं गेल्या दहा वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20396 धावांचा रतीब घातला आहे. या कालावधीत त्यानं 66 शतकं आणि 94 अर्धशतकं झळकावली आहेत. तसंच 2011 सालच्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. आयसीसीचा दशकातला सर्वोत्तम वन डे क्रिकेटर पुरस्काराचाही विराट मानकरी ठरला. गेल्या दहा वर्षात वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजारांपेक्षा अधिक धावा फटकावणारा तो एकमेव फलंदाज आहे. त्यानं वन डेत 39 शतकं आणि 48 अर्धशतकं फटकावली आहेत. तसंच त्यानं गेल्या दहा वर्षात वन डेत 112 झेल पकडले आहेत.
आयसीसीच्या दशकातल्या सर्वोत्तम कसोटी क्रिकेटरचा मान ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला मिळाला. त्यानं गेल्या दहा वर्षांत 7040 कसोटी धावा फटकावल्या आहेत. त्यात 26 शतकं आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे. गेल्या दशकातल्या सर्वोत्तम ट्वेन्टी20 क्रिकेटरचा मान अफगाणिस्तानच्या रशिद खानला घोषित करण्यात आला आहे. त्यानं या कालावधीत ट्वेन्टी20 सामन्यांमध्ये सर्वाधिक 89 विकेट्स घेतल्या आहेत. रशिद खाननं गेल्या दहा वर्षांत ट्वेन्टी20त एकाच सामन्यात तीनवेळा चार विकेट्स आणि दोनवेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. आयसीसीच्या पुरस्कारांवर प्रामुख्यानं भारताचाच ठसा दिसून आला. गेल्या दशकातल्या सर्वोत्तम खेळाडूंच्या आयसीसी कसोटी संघाच्या कर्णधारपदी भारताच्या विराट कोहलीची निवड करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील या संघात ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विनचा समावेश करण्यात आला आहे.
आयसीसीच्या दशकभरातल्या वन डे आणि ट्वेन्टी20 संघांच्या कर्णधारपदी भारताच्याच महेंद्रसिंग धोनीची निवड करण्यात आली. धोनीच्या नेतृत्त्वाखालील आयसीसीच्या वन डे संघात भारताच्या विराट कोहली आणि रोहित शर्माचा समावेश करण्यात आला आहे. तसंच धोनीच्या नेतृत्त्वाखालील आयसीसीच्या ट्वेन्टी20 संघात रोहित आणि विराट यांच्यासह भारताच्या जसप्रीत बुमराची निवड करण्यात आली आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयसीसी स्पिरिट ऑफ द क्रिकेट हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 2011 सालच्या नॉटिंगहॅम कसोटीत धावचीत झालेल्या इंग्लंडच्या इयान बेलला भारताचा तत्कालिन कर्णधार धोनीनं खिलाडूवृत्ती दाखवून माघारी बोलावलं होतं.
ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी ही आयसीसीची गेल्या दशकातली सर्वोत्तम महिला क्रिकेटर ठरली आहे. एलिस पेरीनं गेल्या दहा वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4349 धावा आणि 213 विकेट्स अशी दुहेरी कामगिरी बजावली आहे. या कालावधीत ती चारवेळा ऑस्ट्रेलियाच्या ट्वेन्टी20 विश्वचषक विजेत्या संघाची सदस्य होती. तसंच तिचा समावेश असलेल्या ऑस्ट्रेलिया संघानं एकदा वन डे विश्वचषकाचाही मान मिळवला आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी आणि वन डे या फॉरमॅट्समधली दशकातली सर्वोत्तम महिला क्रिकेटर या दोन्ही पुरस्कारांवर तिनं आपलं नाव कोरलं आहे. एलिस पेरीनं वन डेत 2621 धावा आणि 98 विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी बजावली आहे. तसंच ट्वेन्टी20 सामन्यांमध्ये तिनं 1155 धावा आणि 89 विकेट्स अशी कामगिरी बजावली आहे.