एक्स्प्लोर
टॉस जिंकल्यास फलंदाजी, बैठकीतला 'तो' निर्णय विराटने धुडकावला?

मुंबई : अनिल कुंबळे यांनी टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर कर्णधार विराट कोहलीवर सडकून टीका होत आहे. त्यातच विराटनं नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेल्या क्षेत्ररक्षणाच्या निर्णयावर शंका उपस्थित केली जात आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरायचं असा निर्णय टीमच्या बैठकीत झाला होता. त्यानुसार चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारताने टॉस जिंकल्यावर प्रथम बॅटिंग करणं अपेक्षित होतं. मात्र विराटनं मनमानी करत प्रत्यक्षात क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि सगळ्यांनाच धक्का दिल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. या प्रकरणी तत्कालीन प्रशिक्षक कुंबळे यांनी विराटला जाब विचारला असता, त्यानं उडावाउडवीची उत्तर दिल्याचंही सुत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे भारताच्या पराभवाच्या कारणांमागे कोहलीच्या नेतृत्वातील त्रुटींवरही बोट ठेवलं जात आहे. याशिवाय अनिल कुंबळे यांची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी विराटनं केलेलं ट्वीटही आता डीलिट केलं आहे. त्यामुळे कुंबळे आणि विराट मधला वाद पराकोटीला पोहचल्याचं स्पष्ट चित्र दिसत आहे. अनिल कुंबळे यांनी पद सोडताना विराट कोहलीच्या वर्तनावर आश्चर्य व्यक्त केलं होतं. टीम इंडियाच्या कर्णधाराला माझ्या प्रशिक्षकपदावर आक्षेप असल्याचा आरोप त्यांनी पायउतार होताना केला होता. ‘माझ्या प्रशिक्षणाच्या स्टाईलवर आणि मी हेड कोच म्हणून कार्यरत राहण्यावर कर्णधाराचा आक्षेप असल्याचं पहिल्यांदाच मला बीसीसीआयकडून समजलं. मी कायमच कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्या मर्यादा ओळखून काम करत असल्याने मला धक्का बसला’ असं कुंबळेंनी पुढे म्हटलं होतं. ‘बीसीसीआयने आमच्यातील मतभेद आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र मला असं वाटतं की आता हे पद सोडण्याची वेळ आली आहे. प्रशिक्षकपदाची धुरा बीसीसीआय ज्या व्यक्तीला पात्र समजेल, त्याच्याकडे सुपूर्द करण्याची मी विनंती करतो.’ असंही ते पुढे म्हणाले.
संबंधित बातम्या :
कुंबळेच्या आरोपानंतर विराट कोहली काय बोलणार?
कुंबळेसारख्या प्रशिक्षकाला विरोध करणाऱ्या खेळाडूला हाकला: गावसकर
युवराज आणि धोनीबाबत निर्णय घेण्याची वेळ : राहुल द्रविड
कोहलीला माझ्या प्रशिक्षकपदावर आक्षेप : अनिल कुंबळे
अनिल कुंबळेचं राजीनामा पत्र जसंच्या तसं
अनिल कुंबळे टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार
आणखी वाचा























