2020 US Open : व्हिक्टोरिया अझारेन्का की नाओमी ओसाका? आज महिला एकेरीची अंतिम लढत
US Open 2020 Finals : अझारेन्का आणि ओसाका आजवर चारवेळा आमनेसामने आल्या आहेत. त्यापैकी दोन वेळा ओसाकानं तर एकदा अझारेन्कानं बाजी मारली होती. तर एक सामना अनिर्णित राहिला होता.
न्यूयॉर्क : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या विजेतेपदाचा मान कुणाला मिळणार? याचा फैसला आज मध्यरात्री होणार आहे. न्यूयॉर्कच्या आर्थर अॅश स्टेडियमवर बेलारुसची व्हिक्टोरिया अझारेन्का आणि जपानची नाओमी ओसाका विजेतेपदासाठी आमनेसामने येणार आहेत.
अझारेन्का सात वर्षांनी ग्रँड स्लॅम फायनलमध्ये
अझारेन्कानं यंदाच्या स्पर्धेत दमदार कामगिरी बजावताना तिसऱ्यांदा अमेरिकन ओपनची अंतिम फेरी गाठली आहे. अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सविरुद्ध उपांत्य सामन्यात मिळवलेला विजय अझारेन्काला अंतिम सामन्यात आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. सेरेनाकडे या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात होतं. पण अझारेन्कानं त्या सामन्यात सेरेनाचं कडवं आव्हान पहिला सेट गमावल्यानंतरही मोडीत काढलं. त्यामुळे अझारेन्का आता ओसाकाचं आव्हान कसं पेलवते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अझारेन्कानं 2013 नंतर तिनं ग्रँड स्लॅम फायनल गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी 2012 आणि 2013 च्या यूएस ओपनमध्ये तिनं अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पण दोन्ही वेळा तिला उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं होतं.
ओसाका तिसऱ्या ग्रँड स्लॅम जेतेपदासाठी सज्ज
2018 साली यूएस ओपनच्याच कोर्टवर सेरेनाला हरवून ग्रँड स्लॅम किताब जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. ओसाकाचं ते पहिलंवहिलं ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलं होतं. त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून वर्ल्ड नंबर होण्याचा मान मिळवला होता. तीच ओसाका आता पुन्हा एकदा अमेरिकन ओपन जिंकण्यापासून एक पाऊल दूर आहे. अझारेन्काच्या तुलनेत ओसाकाला यंदाच्या यूएस ओपनमध्ये सोपा ड्रॉ मिळाला. त्यामुळे अंतिम फेरीपर्यंत तिला फार मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागला नाही.
कोणाचं पारडं जड?
अझारेन्का आणि ओसाका आजवर चारवेळा आमनेसामने आल्या आहेत. त्यापैकी दोन वेळा ओसाकानं तर एकदा अझारेन्कानं बाजी मारली होती. तर एक सामना अनिर्णित राहिला होता. दुसरीकडे गेल्या दहा सामन्यात अझारेन्कानं एकही सामना गमवेला नाही. तर ओसाकानं नऊ सामन्यात विजय मिळवलेला आहे. त्यामुळे आज आर्थर अॅश स्टेडियमवर विजेतेपदासाठीच्या लढतीत टेनिसचाहत्यांना तुल्यबळ लढतीची अपेक्षा राहिल.