Tulsidas Balaram : दिग्गज भारतीय फुटबॉलपटू तुलसीदास बलराम यांचं निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; एशियन गेम्ससह ऑलिम्पिकमध्ये सहभाग
Tulsidas Balaram Passes Away : तुलसीदास बलराम यांनी 1962 साली आशियाई खेळांमध्ये भारताचं नाव सुवर्ण पदकावर कोरलं. त्यांनी 1956 आणि 1960 साली ऑलिम्पिक खेळांमध्येही भाग घेतला होता.
Indian footballer Tulsidas Balaram Passes Away : दिग्गज भारतीय फुटबॉलपटू (Legendary Indian Footballer) तुलसीदास बलराम (Tulsidas Balaram) यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बलराम यांनी ऑलिम्पिक (Olympic) आणि आशियाई खेळांमध्ये (Asian Games) भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. तुलसीदास बलराम यांच्या निधनाने क्रिडा जगतावर शोककळा पसरली आहे. तुलसीदास बलराम यांचं मल्टीपल ऑर्गन फेलिअर (Multiple Organ Failure) झाल्याने निधन झालं आहे. त्यांच्यावर कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. तुलसीदास बलराम यांना डिसेंबर महिन्यामध्ये पोट आणि लघवी संबंधित समस्येमुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं.
तुलसीदास बलराम यांच्या निधनाने क्रिडा जगतावर शोककळा
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 डिसेंबर रोजी प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना युरिनरी इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर येत आहे. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यानंतर त्यांनी गुरुवारी 16 फेब्रुवारी रोजी दुपारी अखेरचा श्वास घेतला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सूचनेनुसार क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री अरुप बिस्वास सतत संपर्कात होते आणि त्यांना सर्वतोपरी मदत करत होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी बलराम यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
India's Asian Games gold-medal winning footballer Tulsidas Balaram dies after prolonged illness
— Press Trust of India (@PTI_News) February 16, 2023
50 आणि 60 च्या दशकातील सर्वोत्कृष्ट भारतीय फुटबॉलपटू
दिग्गज भारतीय फुटबॉलपटू तुलसीदास बलराम 50 आणि 60 च्या दशकातील भारतातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंपैकी एक होते. बलराम यांनी मेलबर्न येथे 1956 ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केलं. यावेळी भारत चौथ्या स्थानावर होता. फुटबॉलमधील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी होती.
Deeply saddened to hear about the demise of Shri Tulsidas Balaram ji, the Asian Games gold medalist footballer & Olympian. He represented India in the 1956 & 1960 Olympics, leaving a lasting legacy in the world of football. My condolences to his family. pic.twitter.com/BrrGnC3dhN
— Anurag Thakur (@ianuragthakur) February 16, 2023
आशियाई खेळांमध्ये भारताला पदक
तुलसीदास बलराम यांनी 1962 साली आशियाई खेळांमध्ये भारताचं नाव सुवर्ण पदकावर कोरलं. त्यांनी 1956 आणि 1960 साली ऑलिम्पिक खेळांमध्येही भाग घेतला होता. बलराम यांनी 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्येही भाग घेतला होता. यावेळी त्यांनी हंगेरीविरुद्ध भारताचा पहिला गोल केला होता. तसेच पेरूविरुद्धच्या अंतिम गट सामन्यात त्यांनी पुन्हा गोल केला. 1960 च्या रोम ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने केलेल्या तीन गोलपैकी दोन गोल बलराम यांच्या नावावर होते.