एक्स्प्लोर
Advertisement
श्रीलंकेला वन डेतही धूळ चारण्यासाठी विराट ब्रिगेड सज्ज!
श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेच्या निमित्ताने विश्वचषकासाठी संघबांधणी करण्याचं मोठं उद्दीष्टही बीसीसीआयची निवड समिती आणि भारतीय संघव्यवस्थापनाने बाळगलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून या मालिकेत भारतीय संघात अनेक नवीन प्रयोगही पाहायला मिळतील.
मुंबई : भारत आणि श्रीलंका संघांमधल्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेला आजपासून (रविवार) सुरुवात होत आहे. टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्यातल्या कसोटी मालिकेवर 3-0 असं निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं. त्यापाठोपाठ आता वन डे सामन्यांच्या मालिकेवरही आपल्या वर्चस्वाचा ठसा उमटवण्याचा टीम इंडियाचा इरादा आहे.
पण त्याचवेळी 2019 सालच्या विश्वचषकासाठी संघबांधणी करण्याचं मोठं उद्दीष्टही बीसीसीआयची निवड समिती आणि भारतीय संघव्यवस्थापनाने बाळगलं आहे.
फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने लाहिरू कुमाराचा त्रिफळा उडवला आणि टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्यातल्या कॅण्डी कसोटीसह तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-0 असा निर्विवाद विजय साजरा केला. भारताच्या कसोटी क्रिकेटच्या 85 वर्षांच्या इतिहासात टीम इंडियाने नोंदवलेला हा पहिलाच क्लीन स्विप ठरला.
आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत नंबर वन असलेल्या टीम इंडियाने त्या क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेला कसोटी मालिकेत खऱ्या अर्थाने आपली ताकद दाखवून दिली. कसोटी मालिकेतल्या त्या निर्विवाद विजयाने आत्मविश्वास दुणावलेला भारतीय संघ आता श्रीलंका दौऱ्यातल्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे.
वन डेत कुणाची ताकद किती?
भारत आणि श्रीलंका या दोन संघांची वन डेच्या रणांगणातही या घडीला तुलना होऊ शकत नाही. दोन संघांच्या ताकदीत मोठा फरक आहे. आयसीसीच्या वन डे क्रमवारीत टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर आहे, तर श्रीलंका चक्क आठव्या स्थानावर आहे. त्यामुळs भारत आणि श्रीलंका संघांमधली पाच वन डे सामन्यांची मालिकाही दोन असमान ताकदीच्या फौजांमधली एकतर्फी लढाई ठरण्याची चिन्हं आहेत.
भारतीय संघात नवीन प्रयोग
हीच संधी लक्षात घेऊन बीसीसीआयच्या निवड समितीने श्रीलंकेतल्या मालिकेसाठी भारतीय संघात काही प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मोहम्मद शमी, उमेश यादव, रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा या चार प्रमुख गोलंदाजांना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.
श्रीलंकेतल्या वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी रोहित शर्माला उपकर्णधारपदी बढती देण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार या नात्याने रोहितने आयपीएलच्या मैदानात बजावलेल्या कामगिरीचं हे फलित म्हणावं लागेल. निवड समितीच्या या निर्णयामुळं आणीबाणीच्या काळात कर्णधार विराट कोहलीसाठीही टीम इंडियाच्या हाताशी एक पर्याय राहिल.
मूळचा सलामीचा फलंदाज असलेल्या लोकेश राहुलला श्रीलंकेतल्या या मालिकेच्या निमित्ताने चौथ्या क्रमांकावर खेळवण्याचा प्रयोगही केला जाणार आहे.
शार्दूल ठाकूर आणि मनीष पांडेला श्रीलंकेतल्या वन डे सामन्यांसाठी संधी देण्यामागेही निवड समितीची योजना आहे.
2019 सालचा वन डे सामन्यांचा विश्वचषक आता दोन वर्षांवर आला आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षांत या विश्वचषकासाठी भारतीय संघाची बांधणी करणं हे बीसीसीआयच्या निवड समितीचं मुख्य उद्दीष्ट आहे. एमएसके प्रसाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचीच सुरुवात श्रीलंकेतल्या वन डे मालिकेच्या निमित्ताने केली आहे.
विश्वचषकासारखा आयसीसीचा सर्वोच्च इव्हेंट हा दर चार वर्षांनी येत असतो. हा विश्वचषक जिंकण्यासाठी प्रत्येक संघ हिरीरीने मैदानात उतरतो. मैदानात उतरल्यावर विश्वचषक जिंकून देणं ही संघातल्या खेळाडूंची जबाबदारी असते. पण त्या खेळाडूंना हेरण्याची आणि त्यांना अधिकाधिक एक्स्पोजर देण्याची जबाबदारी ही निवड समितीची असते. एमएसके प्रसाद आणि त्यांच्या निवड समितीने त्या दृष्टीनेच आपली पावलं उचलली आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement