टीम इंडियाच्या अडचणी वाढणार, रोहित आणि ईशांत शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या पहिल्या दोन कसोटींना मुकणार?
आयपीएलदरम्यान रोहित शर्माला मांडीच्या दुखापतीला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे निवड समितीनं रोहितला मर्यादित षटकांच्या मालिकांमधून विश्रांती देत त्याचा कसोटी संघात समावेश केला होता.
INDvsAUS : टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा आणि ईशांत शर्माला अद्याप भारतातच आहेत. आणि म्हणूनच त्यांना ऑस्ट्रेलियाला पाठवण्याची व्यवस्था तातडीनं झाली नाही, तर त्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात ते दोघंही खेळण्याची शक्यता कमी आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
टीम इंडिया युएईतल्या जैव-सुरक्षित वातावरणातून खाजगी विमानानं ऑस्ट्रेलियाला रवाना झाली होती. त्याउलट भारतात परतलेले रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा हे आता प्रवासी विमानानं ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत. त्यामुळं ऑस्ट्रेलियात क्वारंटाईनसाठी त्या दोघांना टीम इंडियापेक्षा अधिक कठोर नियम लावण्यात येतील. रोहित आणि ईशांतला १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागेल. त्यांना यादरम्यान सराव करता येणार नाही. त्यामुळे क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर सरावासाठी पुरेसा वेळ मिळणंही गरजेचं असेल. एकूणच सात जानेवारीपासून सिडनीत होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठीच रोहित आणि ईशांत पूर्ण तयारीनीशी मैदानात उतरु शकतात.
कसा आहे रोहित-ईशांतचा सध्याचा फिटनेस?
आयपीएलदरम्यान रोहित शर्माला मांडीच्या दुखापतीला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे निवड समितीनं रोहितला मर्यादित षटकांच्या मालिकांमधून विश्रांती देत त्याचा कसोटी संघात समावेश केला होता. ईशांत शर्मालाही आयपीएलदरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे आयपीएलनंतर भारतात परतल्यावर हे दोघेही बंगळुरुमधल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेसवर मेहनत घेतायत. पण रोहित पूर्णपणे फिट नसल्यानं त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी दोन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. रोहित शर्मा डिसेंबरच्या आठ तारीखला ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्यास १४ दिवसांच्या क्वारंटाईनला सामोरं जावं लागेल. त्यानंतर साधारण २२ डिसेंबरला त्याला सरावासाठी बाहेर पडता येईल.
बीसीसीआयच्या एका सूत्राच्या माहितीनुसार ईशांत शर्माही दुखापतीतून हळूहळू सावरतोय. गेल्या महिनाभरापासून एनसीएमध्ये ईशांतचा सराव सुरु आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये गोलंदाजाला केवळ चार षटकच गोलंदाजी करावी लागते. पण कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजाला प्रत्येक दिवशी किमान २० षटकं टाकण्याची तयारी ठेवावी लागते. त्यामुळे ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांचा प्रश्न असता तर ईशांतला आताच ऑस्ट्रेलियाला पाठवणं शक्य असतं. पण कसोटी क्रिकेटचा विचार करता ईशांतला पुढचे चार आठवडे गोलंदाजीचा सराव आवश्यक आहे.
रोहितच्या जागी श्रेयसला संधी?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या कसोटी मालिकेत रोहित शर्मा खेळू शकला नाही, तर त्याचा पर्याय म्हणून श्रेयस अय्यरकडे पाहिलं जात आहे. भारताच्या वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या संघांत श्रेयसचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या कसोटी मालिकेसाठी त्याला रोहितचा पर्याय म्हणून थांबवून घेण्यात येईल.
इतर बातम्या