एक्स्प्लोर
रिओ ऑलिम्पिकची सांगता, भारत पदकतालिकेत 67 वा
रिओ दी जनैरो : गेल्या अठरा दिवसांपासून सुरु असलेल्या 2016 च्या रिओ ऑलिम्पिकचा सांगता सोहळा अगदी दिमाखात पार पडला. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी 'बाय बाय रिओ' म्हणत रिओ ऑलिम्पिक संपल्याची घोषणा केली.
रिओतल्या माराकाना स्टेडियमवर रंगलेल्या या सांगता सोहळ्यात ब्राझिलियन कलाकारांनी रंगारंग कार्यक्रम सादर करुन सर्वांचीच मनं जिंकली. सांगता सोहळ्यात भारताची ध्वजवाहक बनण्याचा बहुमान पैलवान साक्षी मलिकला मिळाला.
साक्षीनेच रिओमध्ये भारताचं पदकांचं खातं उघडलं होतं. ऑलिम्पिक पदक मिळवणारी साक्षी भारताची पहिलीच महिला पैलवान ठरली होती. त्यामुळेच ऑलिम्पिकच्या सांगता सोहळ्यात राष्ट्रध्वज घेऊन भारतीय पथकाचं नेतृत्त्व करण्याचा मान साक्षीला देण्यात आला.
यावेळी रिओच्या महापौरांकडून ऑलिम्पिकचा ध्वज आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष थॉमस बाक यांना देण्यात आला. बाक यांनी टोकियोच्या गर्व्हनर युरिको कोईकी यांच्याकडे ऑलिम्पिक ध्वज सुपूर्द केला. जपानचे पंतप्रधान शिन्झो आबे सुपर मारियोच्या अवतारात स्टेडियमवर दाखल झाल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 2020 च्या ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन जपानच्या टोकियोत करण्यात आलं आहे.
पदकतालिकेत अमेरिका अव्वल :
रिओ ऑलिम्पिकवर पुन्हा एकदा अमेरिकेचंच वर्चस्व पाहायला मिळालं. अमेरिकेनं 121 पदकं जिंकून पदकतालिकेत अव्वल स्थान मिळवलं. अमेरिकेच्या खात्यात 46 सुवर्ण, 37 रौप्य आणि 38 कांस्यपदकं जमा झाली आहेत.
ग्रेट ब्रिटननं दुसरं स्थान मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ग्रेट ब्रिटनच्या खात्यात 27 सुवर्ण, 23 रौप्य आणि 17 कांस्य अशी एकूण 67 पदकं जमा आहेत. चीनच्या खेळाडूंनी मात्र यंदा निराशा केली. चीननं 26 सुवर्ण, 18 रौप्य आणि 26 कांस्य अशी एकूण 70 पदकांसह तिसरं स्थान मिळवलं.
भारताला पदकतालिकेत 67 व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. भारताच्या खात्यात एक रौप्य आणि एक कांस्यपदक अशी दोन पदकं जमा आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement