एक्स्प्लोर
टीम इंडियानं एजबॅस्टन कसोटी का गमावली?
विराट कोहलीच्या टीम इंडियानं इंग्लंड दौऱ्यात तीन ट्वेन्टी२० सामन्यांची मालिका जिंकली, पण तीन वन डे सामन्यांची मालिका गमावली. आता एजबॅस्टनच्या पहिल्या कसोटी सामन्यातही भारतीय संघावर हार स्वीकारण्याची वेळ आली आहे. काय आहेत टीम इंडियाच्या या पराभवाची कारणं?

लंडन : अखेर बेन स्टोक्सनं हार्दिक पंड्याचाही काटा काढला आणि एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं. इंग्लंडनं या कसोटीत टीम इंडियाचा दुसरा डाव १६२ धावांत गुंडाळून ३१ धावांनी विजय साजरा केला.
इंग्लंडच्या इतिहासातला हा हजारावा कसोटी सामना होता. त्यामुळं ज्यो रूट आणि त्याच्या इंग्लिश आर्मीसाठी एजबॅस्टनवरचा विजय हा खूपच गोड ठरला असावा.
एजबॅस्टनच्या पहिल्या कसोटीत खरं तर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांना विजयाची समसमान संधी होती. किंबहुना टीम इंडियासमोरचं विजयासाठीचं १९४ धावांचं लक्ष्य पाहिलं तर ही कसोटी भारताच्या बाजूनं अधिक झुकलेली होती. मग असं काय झालं की, भारतीय संघाला एजबॅस्टन कसोटीत हार स्वीकारण्याची वेळ आली? काय आहेत टीम इंडियाच्या पराभवाची कारणं?
पहिलं कारण : विराट कोहलीला दुसऱ्या एंडनं दमदार साथ न लाभणं
विराट कोहलीसारखा शिलेदार हा ट्वेन्टी ट्वेन्टी आणि वन डेसारख्या लढाया एकहाती जिंकून देऊन शकतो. पण कसोटी सामन्याचं युद्ध जिंकायचं, तर विराट कोहलीसारख्या महारथीलाही समोरच्या एंडनं साथ लाभणं आवश्यक असतं. भारतीय कर्णधारानं पहिल्या डावात १४९ धावांची, तर दुसऱ्या डावात ५१ धावांची धीरोदात्त खेळी उभारली. पण एजबॅस्टन कसोटी जिंकायची, तर भारतीय डावात भागिदारीची उणीव प्रकर्षानं जाणवली.
दुसरं कारण : भारतीय फलंदाजांचं नाव मोठं लक्षण खोटं
एजबॅस्टन कसोटीच्या दोन्ही डावांत विराट कोहलीचा संघर्ष एकाकी ठरला. भारताच्या दोन्ही डावांत भागिदाऱ्या झाल्या नाहीत, हे जितकं खरं, तितकंच भारतीय फलंदाजांना वैयक्तिक धावांची टांकसाळ उघडण्यातही अपयश आलं. मुरली विजय, शिखर धवन, लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणे या महारथींचा एजबॅस्टन कसोटीतला सहभाग हा नाव मोठं लक्षण खोटं ठरवणारा ठरला. सॅम करनसारख्या कोवळ्या गोलंदाजांनं भारतीय फलंदाजांची फळी पहिल्या डावात कापून काढली.
तिसरं कारण : सॅम करनला रोखण्यात भारतीय गोलंदाजांना आलेलं अपयश
ईशांत शर्मा आणि रवीचंद्रन अश्विनच्या प्रभावी गोलंदाजीनं दुसऱ्या डावात इंग्लंडची सात बाद ८७ अशी केविलवाणी अवस्था केली होती. त्या परिस्थितीत आठव्या क्रमांकाच्या सॅम करननं तळाच्या तीन फलंदाजांना साथीला घेऊन इंग्लंडच्या धावसंख्येत तब्बल ९३ धावांची भर घातली. त्यानं भारतीय आक्रमणावर हल्ला चढवून नऊ चौकार आणि दोन षटकारांसह ६३ धावा वसूल केल्या. सॅम करनच्या या कामगिरीनं भारतासमोरचं आव्हान तुलनेत कठीण बनलं.
चौथं कारण : टीम इंडियाला जाणवली दुसऱ्या फिरकी गोलंदाजाची उणीव
रवीचंद्रन अश्विननं दोन्ही डावांत सात विकेट्स काढून एजबॅस्टन कसोटी गाजवली. पहिल्या डावात मोहम्मद शमी आणि दुसऱ्या डावात ईशांत शर्मानं विकेट्स काढून अश्विनचा भार हलका केला. पण भारतीय संघात दुसरा फिरकी गोलंदाज असता, तर अश्विनचं काम आणखी हलकं आणि इंग्लंडचं काम तमाम झालं असतं.
एजबॅस्टन कसोटीतल्या चुकांपासून विराट कोहलीच्या टीम इंडियानं बोध घेण्याची गरज आहे. इंग्लंड दौऱ्यातल्या मालिकेत अजूनही चार कसोटी सामने शिल्लक आहेत. त्यात बाजी मारायची, तर टीम इंडियाला नव्या जोमानं सज्ज होण्याची गरज आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
