महाराष्ट्र केसरीची तयारी अंतिम टप्प्यात, पदकांचे अनावरण, अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुण्यातील अमनोरा टाऊनशिपचे विकासक असलेल्या सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे आयोजित 63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या पदकांचे आज म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे अनावरण करण्यात आले.
पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुण्यातील अमनोरा टाऊनशिपचे विकासक असलेल्या सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे आयोजित 63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या पदकांचे अनावरण आज परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या हस्ते म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे करण्यात आले. स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून पैलवान, पंच, प्रशिक्षकांच्या वर्दळीने क्रीडा संकुलात नवचैतन्य संचारले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन उद्या शुक्रवारी (3 जानेवारी)सायंकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार संग्राम थोपटे, आमदार सुनील शेळके, क्रीडा व युवक सेवा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, सहसंचालक जयप्रकाश दुबळे, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवडीचे उपसंचालक आनंद व्यन्केश्वर, क्रीडा व युवक सेवा मुख्यालयाचे उपसंचालक सुधीर मोरे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, रुस्तुम-ए-हिंद अमोल बुचडे, सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, परिषदेचे कार्यालयीन अधिकारी ललित लांडगे, परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, भारतीय शैली कुस्ती महासंघाचे सहसचिव चंद्रशेखर शिंदे, प्रसिद्ध अभिनेता प्रवीण तरडे यांनी आखडे व तयारीची पाहणी केली.
शक्ती आणि युक्तीचा संगम असलेल्या कुस्ती या खेळाची भव्यता आणि लोकप्रियतेची प्रचिती स्पर्धेसाठी सज्ज झालेले आखाडे बघून येते. मातीवरील कुस्तीसाठी 2 आणि मॅटवरील कुस्तीसाठी 2 आखाडे स्पर्धेच्या ठिकाणी सज्ज झाले आहेत. येथे मावळ व मुळशी भागातील डोंगरांवरून चांगल्या प्रतीची 40 ब्रास माती आणून 20-20 ब्रासचे दोन आखडे तयार करण्यात आले आहेत. या मातीत 1000 लिंबू, 250 किलो हळद, 50 किलो कापूर, रोज 100 लीटर ताक आणि 60 लीटर तेल घालून मातीचे आखडे तयार झाले आहेत. पैलवानांना स्पर्शातून, जखमातून कोणत्याही प्रकारचे आजार किंवा लागण होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येत असते. 40 बाय 40 चे रिंगण व 30 बाय 30 चा प्रत्यक्ष खेळाचा भाग अशा प्रकारे हे चारही आखडे तयार आहेत. आखड्यांचा हा मुख्य मंच 60 बाय 210 फुटांचा असून त्या बाहेर 10 फुटाचा भाग पंचांसाठी व त्या बाहेर 10 फुट भाग पैलवानांच्या तयारीसाठी सज्ज करण्यात आहे.
सकाळपासून राज्यातील 44 जिल्ह्यांमधून पैलवनांचे आगमन सुरू झाले असून तब्बल 900 ते 950 कुस्तीगीर व 125 पंच या स्पर्धेसाठी बालेवाडी येथे दाखल झाले आहेत. दिवसभरात पंचांचे दोन उजळणी सत्र झाले. उद्या सहभागी होणार्या 'अ' विभाग (57 व 79 किलो)गटातील तब्बल 200 पैलवानांची आज वैद्यकीय तपासणी व वजने करण्यात आली.
पदकांविषयी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला साजेशी अशी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके या स्पर्धेसाठी बनविण्यात आली आहेत. ऑलिंपिक स्पर्धांमधील पदकांच्या दर्जाची या पदकांची डिझाईन असून यांचे वजन प्रत्येकी 450 ग्रॅम आहे. वरच्या भागत अमनोरा लिहिलेले असून वर्तुळात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा लोगो टाकण्यात आला आहे. रोज होणार्या स्पर्धांच्या शेवटी रोज पदक वितरण समारंभ होणार असून एकूण 20 सुवर्ण, 20 रौप्य व गादी विभागासाठी 40 तर मातीसाठी 30 कांस्य पदके तयार करण्यात आली आहेत.
प्रवीण तरडेंची हजेरी यावेळी अभिनेता प्रवीण तरडे याने भेट दिली. प्रवीण म्हणाला की, स्वतः रुस्तूम-ए-हिंद अमोल बुचडे यात लक्ष घालत असल्याने तयारी योग्य होणारच. मीदेखील एकेकाळी कुस्ती खेळत होतो. आज सिनेमा क्षेत्रात असलो तरी कुस्ती आणि मातीशी नाळ तुटलेली नाही, म्हणूनच येथे आल्यावाचून राहावले नाही. कुस्ती आपली आहे. त्यामुळे येथे निमंत्रणची वाट न बघता घरचे लग्न असल्यासारखे स्वतःहून यायला हवे.
उद्या (शुक्रवार 3 जानेवारी) चे वेळापत्रक पुढील प्रमाणे सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत कुस्ती स्पर्धा अ विभाग (57 व 89 किलो) दुपारी 12 ते 1 वैद्यकीय तपासणी व वजने ब विभाग (61,70 व 86 किलो) दुपारी 4 ते सायंकाळी 6 वाजता- कुस्ती स्पर्धा अ व ब विभाग (57, 61,70, 79 व 86 किलो) सायंकाळी 5 वाजता - उद्घाटन समारंभ - उपस्थिती अजित पवार