Tokyo Olympics | कुस्तीपटू विनेश फोगाट टोकियो ऑलिम्पिक दरम्यान शिस्तभंग केल्याने निलंबित
भारतीय कुस्ती महासंघाने विनेश फोगटला नोटीस बजावून तीन प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. तिला 16 ऑगस्टपर्यंत महासंघाला उत्तर द्यावे लागणार आहे.
Tokyo Olympics 2020: कुस्तीपटू विनेश फोगटवर टोकियो ऑलिम्पिक दरम्यान शिस्तभंगाचा आरोप होता. यामुळे भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) विनेशला तात्पुरते निलंबित केले आहे. क्रीडा क्षेत्रातील अनुशासनाबद्दल कुस्तीपटू विनेशवर महासंघ नाराज आहे. फोगटने स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये राहण्यास आणि भारतीय संघातील इतर सदस्यांसह प्रशिक्षणाला नकार दिला होता. मुख्य प्रशिक्षक कुलदीप मलिक यांच्याशीही तिचा वाद झाला होता.
16 ऑगस्टपर्यंत नोटीसला उत्तर द्यावे लागेल
डब्ल्यूएफआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विनेशला डब्ल्यूएफआयचे प्रमुख ब्रिज भूषण शरण सिंह यांनी जारी केलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी 16 ऑगस्टपर्यंत वेळ देण्यात आला आहे. अधिकारी म्हणाले, तीन मुद्दे आहेत ज्यावर WFI ने विनेशकडे उत्तर मागितले आहे. पहिला, तिने संघ सदस्यांसोबत राहण्यास नकार का दिला? दुसरे, तिने इतर खेळाडूंसोबत प्रशिक्षण का घेतले नाही? तिसरे, तिने भारतीय दलाला प्रायोजित करणाऱ्या ब्रँडची नावे का घातली नाहीत, तर नायकीचा लोगो घातला होता.
राष्ट्रीय आणि देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकत नाही
अधिकाऱ्यांनी सांगितले, की "आमचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह तिच्या नखऱ्यामुळे अस्वस्थ होते. मला वाटतं की तिने या सगळ्यांऐवजी स्वतःच्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तिला तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. जोपर्यंत ती उत्तर दाखल करत नाही आणि WFI अंतिम निर्णय घेत नाही तोपर्यंत विनेश कोणत्याही राष्ट्रीय किंवा अन्य घरगुती स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही.
गेल्या वर्षीही महासंघ आणि विनेश आमनेसामने
विनेश ऑलिम्पिक स्पर्धेत अव्वल पदकाची दावेदार म्हणून दाखल झाली होती. पण बेलारूसच्या व्हेनेसा कलाडिन्स्कायाविरुद्ध तिला पराभव पत्कारावा लागला. विनेश आणि WFI समोरासमोर येण्याची ही पहिली वेळ नव्हती. गेल्या वर्षी नॅशनल्समध्ये विनेशने कोविडच्या भीतीचे कारण देत सहभागी होण्यास नकार दिला होता.