(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sania Mirza on Wimbledon: सानिया मिर्झाचे आई म्हणून तिच्या पहिल्या विम्बल्डनमध्ये विजयी पुनरागमन
प्रदीर्घ काळानंतर टेनिस मैदानावर परतलेल्या भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने आई म्हणून तिच्या पहिल्या विम्बल्डनमध्ये विजयी पुनरागमन केलं आहे.
विम्बल्डनच्या हिरवळीवर 3 वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर भारताची सर्वात यशस्वी महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने ग्रँड स्लॅम सर्किटवर विजयी पुनरागमन केले. अमेरिकेच्या बेथानी मॅटेक-सँड्सबरोबर पुन्हा एकदा भागीदारीत खेळत सानिया मिर्झाने आई म्हणून आज विम्बलडनचा पहिला सामना खेळला.
या विजयासोबत सानिया मिर्झा आणि तिची अमेरिकन जोडीदार बेथानी मॅटेक-सँड्स यांनी विम्बल्डन येथे महिला दुहेरीच्या दुसर्या फेरीत प्रवेश केला. सानिया-बेथानीने डिजायर क्राझिक आणि अॅलेक्सा गुआराची या सहाव्या मानांकित जोडीचा पराभव केला.
दोघीही महिला दुहेरीत जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाच्या खेळाडू आहेत. 6 वेळा ग्रँड स्लॅम चॅम्पियन सानिया मिर्झा आणि 9 वेळा ग्रँड स्लॅम विजेती बेथानी मॅटेक-सँड्स ही डिजायर क्राझिक-अॅलेक्सा गुआराची या सहाव्या मानांकित जोडीसाठी खूपच भारी ठरल्या. इंडो-अमेरिकन जोडीने आपल्या अनुभवाने या जोडीला धक्का दिला. चिली-अमेरिकन जोडीवर 7-5, 6-3 असा विजय मिळविला आहे.
तिसर्या गेममध्ये बेथानीची सर्व्हिस 7 वेळा ड्युस झाली तेव्हा सामन्याच्या सुरूवातीलाच भारत आणि अमेरिकेच्या जोडीवर दबाव निर्माण झाला होता. अमेरिकन खेळाडूने तीन डबल फॉल्ट केले. मात्र, तीन ब्रेक पॉईंट्स वाचवल्यानंतर आपली सर्व्हिसही वाचवली.
2018 मध्ये प्रसूती रजा घेतल्यापासून नियमित टेनिस खेळण्यापासून सानिया दूर होती. सानिया मिर्झा तिचा पाकिस्तानी क्रिकेटपटू पती शोएब मलिक, मुलगा इझान याच्यासह आता सर्किटवर पुनरागमन करीत आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी तिची तयारी सुरु आहे. हा तिचा सलग चौथा ऑलिम्पिक अलणार आहे. सानिया मिर्झा या महिन्याच्या शेवटी जपानमध्ये भारताची एकेरी आणि दुहेरीमधील पहिल्या क्रमांकाची खेळाडू अंकिता रैनाबरोबर भागीदारी करेल.
विम्बल्डन कोर्टात पुन्हा एकदा उतरुन इझानची आई सानिया मिर्झाने स्वतःला सिद्ध केलंय. तिची दीर्घाकालची जोडीदार बेथानी मॅटेक सँड्ससोबत हा विजयी रथच असाच सुरु राहण्याची आशा सर्व चाहत्यांना लागली आहे. तर मिश्र दुहेरीत सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना पुन्हा एकत्र खेळताना दिसणार आहेत. 2016 च्या रिओ ऑलिम्पिक उपांत्य फेरीतील जोडी उद्या विम्बल्डन येथे आपली नेहमीची जादू दाखवतील का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.