Swapnil Kusale: मराठमोळा ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेसाठी मध्य रेल्वेने पेटारा उघडला, थेट ऑफिसर करणार!
Paris Olympics 2024: स्वप्नीलच्या या कामगिरीनंतर रेल्वे प्रशासनाला देखील आनंद झाला आहे.
Paris Olympics 2024 Maharashtra Athletes Swapnil Kusale: भारताचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने (Swapnil Kusale) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024)आज इतिहास रचला आहे. स्वप्नील कुसाळेने नेमबाजीत 50 मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले आहे.
🇮🇳🥉 𝗧𝗿𝗶𝗽𝗹𝗲 𝗕𝗿𝗼𝗻𝘇𝗲 𝗳𝗼𝗿 𝗜𝗻𝗱𝗶𝗮, 𝘁𝗿𝗶𝗽𝗹𝗲 𝘁𝗵𝗲 𝗷𝗼𝘆!
— India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) August 1, 2024
👉 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 @sportwalkmedia 𝗳𝗼𝗿 𝗲𝘅𝘁𝗲𝗻𝘀𝗶𝘃𝗲 𝗰𝗼𝘃𝗲𝗿𝗮𝗴𝗲 𝗼𝗳 𝗜𝗻𝗱𝗶𝗮𝗻 𝗮𝘁𝗵𝗹𝗲𝘁𝗲𝘀 𝗮𝘁 𝘁𝗵𝗲 𝗣𝗮𝗿𝗶𝘀 𝗢𝗹𝘆𝗺𝗽𝗶𝗰𝘀 𝟮𝟬𝟮𝟰!
📸 Pics belong to the respective owners… pic.twitter.com/mgy6wmLrLJ
मराठमोळ्या स्वप्नीलच्या या कामगिरीनंतर देशासह संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. स्वप्नील कुसाळे हे 2015 पासून मध्य रेल्वेत कार्यरत आहेत. ज्याप्रमाणे एमएस धोनी त्याच्या आयुष्यात तिकीट कलेक्टर होता, त्याचप्रमाणे स्वप्नील देखील मध्य रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून काम करतो. स्वप्नीलच्या या कामगिरीनंतर रेल्वे प्रशासनाला देखील आनंद झाला आहे.
मध्य रेल्वेने स्वप्नीलसाठी पेटारा उघडला-
स्वप्निल कुसाळे यांनी इतिहास रचलेला आहे. बहात्तर वर्षानंतर एका मराठी मुलाला ऑलिंपिकमध्ये पदक मिळालेले आहे मात्र हा स्वप्निल सध्या मध्य रेल्वेच्या पुणे डिव्हिजन मध्ये टीसी म्हणून काम करतोय. यामुळेच मध्य रेल्वेसाठी ही गर्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस स्वप्निल हा पॅरिस हून भारतात येईल त्यावेळेस भारतीय रेल्वेकडून त्याचा यथोचित सन्मान केला जाईल आणि ताबडतोब त्याला ऑफिसर म्हणून प्रमोशन देण्यात येणार आहे, अशी घोषणा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी केली. त्याचप्रमाणे रेल्वेमंत्री स्वप्नीलसाठी रोख बक्षीस देखील जाहीर करणार आहेत, त्यामुळे आता स्वप्निल हा मध्य रेल्वेचा एक ऑफिसर म्हणून यापुढे काम करेल, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी जाहीर केले आहे. तसेच मध्य रेल्वेची अंकिता ध्यानी ही देखील ऑलम्पिकसाठी पॅरिसला गेली असल्याने तिला देखील राम करण यादव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नेमबाज स्वप्नील कुसाळेचे अभिनंदन
स्वप्नीलमुळे कुस्तीमध्ये भारतासाठी वैयक्तिक असे पहिले पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांचे स्मरण झाले. तब्बल 72 वर्षांनी स्वप्नीलने महाराष्ट्रासाठी या पदकाचा वेध घेऊन, तशाच पद्धतीचा आनंद आणि उत्साह राज्यातील क्रीडा क्षेत्रासाठी निर्माण केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नेमबाजीची एक मोठी परंपरा आहे. ही परंपरा स्वप्नीलने कायम राखली आहे. कांबळवाडी सारख्या ग्रामीण भागातून येऊन स्वप्नीलने आपले राज्य आणि देशाचे नाव आंतरराष्ट्रीयस्तरावर झळकवले आहे. देशासाठी वैयक्तिक पदकाची कमाई करताना, स्वप्नीलने महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातील गौरव वाढवला आहे. स्वप्नीलच्या या यशात त्यांचे कुटुंबिय, प्रशिक्षक, मार्गदर्शक यांचे मोलाचे योगदान आहे, या सर्वांचे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्यावतीने अभिनंदन, असे मुख्यमंत्र्यानी यापुढेही स्वप्नीलच्या वाटचालीसाठी आवश्यक असे सर्व ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही एकनाथ शिंदेंनी दिली.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
स्वप्नील कुसळे याने आॅलम्पिकमध्ये मिळवलंय. खाशाबा जाधव यांच्यानंतर पहिलं पदक मिळालं आहे. स्वप्नील कुसळे यांचे अभिनंदन करतो. देशाचा मान त्यांनी वाढवला त्यासाठी त्यांचे अभिनंदन करतो, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
स्वप्नीलने इतिहास रचला
भारताच्या स्वप्नील कुसळेने इतिहास रचला आहे. पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत स्वप्नीलने कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिकमधील 50 मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत भारतीय नेमबाजाने प्रथमच पदक जिंकले आहे. सध्या सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक आहे. स्वप्नीलने एकूण 451.4 गुण मिळवले.
स्वप्नीलच्या आज्जीचा आनंद गगनात मावेनासा-
नातवानं ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर स्वप्नीलच्या आज्जीच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. आज्जीचे डोळे आंनदाश्रूंनी भरले होते. एबीपी माझाशी बोलताना आज्जी म्हणाली की, "लय चांगलं झालं... म्हाया नातवानं करुन दावलं, माझा नातू लय मोठ्ठा झाला... आमचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी हाय... लहानाचा मोठ्ठा झालाय, लहानपणापासून बाहेर गेलाय, लय चांगलं झालं.." पुढे बोलताना स्वप्नील आल्यानंतर त्याचं कौतुक कसं करणार आज्जींना विचारल्यानंतर त्याचे मुके घेऊन त्याचं कौतुक करणार असल्याचं आज्जींनी सांगितलं.