Olympics 2024 : ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना किती पैसे मिळतात? जाणून घ्या
Paris Olympics 2024: ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदक जिंकल्यास त्यांना किती पैसे मिळतात यासंदर्भात सामान्य नागरिकांमध्ये उत्सुकता असते.
Paris Olympics 2024 नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) येत्या काही दिवसांमध्ये सुरु होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकची सुरुवात 26 जुलै रोजी होणार असून 11 ऑगस्ट पर्यंत ते सुरु राहणार आहे. यापूर्वीच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खेळाडूंनी 7 पदकं जिंकली होती. नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) सुवर्णपदक जिंकलं होतं. इतर खेळाडूंनी 2 रौप्य पदकं जिंकली होती. तर, चार खेळाडूंनी कांस्य पदकावर नाव कोरलं होतं. भारतानं आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये 35 पदकं जिंकली आहेत. ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना केंद्र सरकार किती रक्कम देते हे अनेकांना माहिती नसते.
ऑलिम्पिक संघाकडून किती रक्कम मिळते?
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघाकडून ऑलिम्पिक खेळांमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना आर्थिक रुपात रक्कम देते हा सवाल अनेकांना पडतो. मात्र, ऑलिम्पिक संघाकडून खेळाडूंना पैसे दिले जात नाही. मात्र, काही देशातील सरकारांकडून आणि राज्य सरकारांकडून खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून रक्कम दिली जाते.
भारतीय खेळाडूंना किती रक्कम मिळते?
ऑलिम्पिक खेळात भारतासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना केंद्र सरकारकडून 75 लाख रुपये दिले जातात. रौप्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना 50 लाख तर कांस्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना 30 लाख रुपये दिले जातात. याशिवाय राज्य सरकारं देखील त्यांच्या राज्यातील खेळाडूंना आर्थिक स्वरुपात बक्षीस जाहीर करतात. याशिवाय काही खेळाडूंना विशेष बाब म्हणून शासकीय नोकरीत संधी दिली जाते.
नीरज चोप्रानं 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं होतं. केंद्र सरकारनं नीरज चोप्राला 75 लाख रुपये दिले होते. नीरज चोप्रा हरियाणाचा असल्यानं त्याला तिथल्या राज्य सरकारनं 6 कोटी रुपये दिले होते. तर, गेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या पी.वी. सिंधूला आंध्र प्रदेश सरकारनं आणि बीसीसीआयनं देखील बक्षीस दिलं होतं.
टोकियो ऑलिम्पिकचं आयोजन करोना संसर्गाच्या काळात झालं होतं. भारतानं त्यावेळी 7 पदकं जिंकली होती. भारतानं एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदकं जिंकली होती.पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला हॉकीच्या दोन्ही संघांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. भारताच्या हॉकी संघानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. तर, महिला हॉकी संघानं दमदार कामगिरी केली होती.मात्र, त्यांना पदक मिळवण्यात अपयश आलं होतं. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानू हिनं रौप्य पदक जिंकलं होतं.
संबंधित बातम्या :
ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके जिंकणारा भारतीय खेळाडू कोण?; 60 वर्षांचा अभेद्य विक्रम आजही कायम!
पी. व्ही. सिंधू अन् ए. शरथ कमल पॅरिस ऑलिम्पिकसाठी ध्वजवाहक; गगन नारंगची पथकप्रमुख म्हणून निवड