सलाम... क्रीडा क्षेत्रातील चारही मानाचे पुरस्कार मिळवणारे लढवय्ये विजय मुनिश्वर
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार,अर्जुन पुरस्कार, दादोजी कोंडदेव पुरस्कार पाठोपाठ आता द्रोणाचार्य पुरस्कार. क्रीडा क्षेत्रातील हे चारही मानाचे पुरस्कार मिळवणारे राज्यातील एकमेव क्रीडापटू व प्रशिक्षक नागपुरातील विजय मुनिश्वर...राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या औचित्यानं महाराष्ट्रातील या लढवय्या खेळाडू आणि उमद्या प्रशिक्षकावर एबीपी माझाचं विशेष वृत्त.
नागपूर : शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार,अर्जुन पुरस्कार, दादोजी कोंडदेव पुरस्कार पाठोपाठ आता द्रोणाचार्य पुरस्कार. क्रीडा क्षेत्रातील हे चारही मानाचे पुरस्कार मिळवणारे राज्यातील एकमेव क्रीडापटू व प्रशिक्षक म्हणजे नागपुरचे विजय मुनिश्वर. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर आज मुनीश्वर यांच्या पॅरा पॉवरलिफ्टींगमधील उल्लेखनीय योगदानाबद्दल मानाच्या द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या औचित्यानं महाराष्ट्रातील या लढवय्या खेळाडू आणि उमद्या प्रशिक्षकावर एबीपी माझाचं हे विशेष वृत्त.
ज्या खेळामध्ये सामान्यपेक्षा जास्त शारीरिक क्षमतेची गरज असते त्या खेळामध्ये दिव्यंग असताना ही देशासाठी अनेक मेडल जिंकणारे. आणि त्याच क्षमतेचे इतर अनेक खेळाडू घडवणारे विजय मुनिश्वर. खेळाडू म्हणून शिवछत्रपती आणि अर्जुन पुरस्कार, त्यानंतर प्रशिक्षक म्हणून दादोजी कोंडदेव आणि आता द्रोणाचार्य पुरस्कार जिंकणाऱ्या विजय मुनिश्वर यांची उत्तम पॅरापॉवरलिफ्टर बनण्याची कथा ही तेवढीच खास आहे. विजय मुनीश्वर अवघे 11 महिन्यांचे असताना त्यांना पोलिओने ग्रासले होते. त्यामुळे त्यांचा कमरेखालचा भाग लुळा पडला होता. आता आयुष्याचे काय होईल या चिंतेने त्यांचे कुटुंबीय चिंतेत सापडले होते. मात्र,सत्याचा स्वीकार करत विजय मुनिश्वर यांच्या आईने त्यांच्या उपचाराकरता खूप मेहनत घेतली. त्यामुळे हळू हळू विजय मुनीश्वर याना उभे राहता येणं शक्य झाले. मात्र तरीही त्यांच्या डाव्या पायाला कायमचं अंपगत्व आलंच. बालवयात मुनिश्वर यांना त्यावरूनच अनेक जण अपमानास्पद बोलायचे. ते टोमणे विजय यांच्या मनावर खोलवर रुजले आणि तिथेच एका लढवय्या खेळाडूचा जन्म झाला होता. आपण जीवनात काही तरी करून दाखवायचं हा ध्यास घेत लहान वयातच त्यांनी शारिरिक क्षमता वाढवण्यासाठी आखाड्यात कुस्तीचे धडे घेणे त्यांनी सुरु केले होते. हळू हळू बॉक्सिंगची आवड जडली. मात्र, स्पर्धात्मक खेळताना अपंगत्व आडवं आलं आणि विजय मुनीश्वर आधी आर्म रेसलिंग आणि नंतर पॅरा पॉवरलिफ्टिंगकडे वळले.
दिव्यांग खेळाडूंना घडवण्याचा विडा उचलला
आर्म रेसलिंगपासून सुरुवात करून विजय यांनी जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकापर्यंत झेप घेतली. नंतर मोर्चा वळविला तो पॅरापॉवरलिफ्लटिंगकडे. पॅरापॉवरलिफ्टर म्हणून विजय मुनीश्वर यांनी गेल्या तीन दशकात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मेडल्स जिंकले आणि पॅरापॉवरलिफिटिंग क्रीडा प्रकारात आपला दबदबा निर्माण केला. तब्बल 6 पॅराऑलिम्पिकमध्ये त्यांनी देशाचा प्रतिनिधित्व करत अनेक मेडल्स भारताला जिंकून दिले आहे. खेळाडू म्हणून मिळालेल्या भरघोस यशाने समाधानी न होता विजय मुनीश्वर स्वतः खेळत असतानाच आपल्यासारख्या दिव्यांग खेळाडूंना घडवण्याचा विडा उचलला आणि प्रशिक्षणाच्या क्षेत्राकडे ही लक्ष घातले. गेल्या काही वर्षात त्यांच्या शिष्यांनी पॅरापॉवरलिफ्टिंग मध्ये अनेक मेडल्स जिंकून आपल्या गुरूचा विश्वास सार्थ ठरवला आहे. विशेष म्हणजे विजय मुनीश्वर यांनी शिकविल्या अनेक खेळाडूंनी आजवर शिवछत्रपती आणि अर्जुन पुरस्कार सारखे मानाचे सन्मान पदरात पाडले आहे. तर मुनीश्वर यांचे 125 पेक्षा जास्त शिष्य क्रीडा क्षेत्रातील कामगिरीच्या जोरावर आज विविध शासकीय नोकऱ्यांवर आहेत.
दिव्यांग खेळाडूंना ही चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण मिळावे, चांगल्या सोयी मिळाव्या यासाठी विजय मुनीश्वर यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी खास जिम तयार केली आहे. जिम करताना कोणत्याही औषध किंवा प्रोटिन्सच्या शॉर्टकटचा वापर करून लवकर यश पदरात पाडण्यापेक्षा तंत्रशुद्ध मार्गदर्शन करण्यावर विजय मुनीश्वर यांचा भर असतो. त्यामुळे फक्त पॉवरलिफ्टिंगचा नाही तर इतर क्रीडा क्षेत्रातील खेळाडूही शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी त्यांच्याकडे येतात. त्यामध्ये महारष्ट्रासह देशभरातील खेळाडूंचा समावेश असतो. विशेष म्हणजे दिव्यांग खेळाडूच्या मनातील शारीरिक कमकुवतपणाचा न्यूनगंड बाहेर काढणे आणि त्यांच्यातला खेळाडू जागा करणे हे दोन्ही काम विजय मुनीश्वर सहज करतात. म्हणून ते खेळाडूंचे आवडते प्रशिक्षक आहेत.
खऱ्या अर्थाने द्रोणाचार्याची भूमिका पार पाडली
आज विजय मुनीश्वर सिव्हील इंजिनअर म्हणून वेस्टर्न कोल फिल्ड मध्ये काम करत असून तिथेही प्रशिक्षक म्हणून अनेक पॅराऑलिम्पियन त्यांनी घडविले आहे. स्वतःच्या अपंगत्वाचा कधी ही बाऊ न करता. नियतीच्या त्या निर्णयामुळे निराश न होता पॅरापॉवरलिफ्टिंगमध्ये खेळाडू म्हणून विजय मुनिश्वर यांनी घेतलेली झेप थक्क करणारी आहेच. मात्र ते एवढ्यावरच थांबले नाही. तर त्यांनी अनेक दिव्यांगाना प्रशिक्षण देत खऱ्या अर्थाने द्रोणाचार्याची भूमिका पार पाडली आहे. राष्ट्रीय क्रीडादिनी महाराष्ट्राच्या या लढवय्या खेळाडू आणि उमद्या प्रशिक्षकाचा सन्मान होणं नक्कीच महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.