MS Dhoni Farewell Match: धोनीसाठी फेअरवेल मॅच ठेवण्याची बीसीसीआयची इच्छा... कधी असणार मॅच?
BCCI Planning Farewell Match for MS Dhoni: फेअरवेल मॅच व्हावी यासाठी धोनी सहमत होऊन अगर न होवो, मात्र धोनीचा सन्मान करणे आमच्यासाठी सन्मान असणार आहे, असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं.
मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने अचानक निवृत्ती जाहीर केली. मात्र भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) महेंद्रसिंग धोनीसाठी फेअरवेल मॅचचे आयोजन करणार आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, येत्या आयपीएलदरम्यान बोर्ड याप्रकरणी महेंद्रसिंह धोनीशी चर्चा करेल आणि त्यानंतर त्यानुसार भविष्यातील वेळापत्रक ठरणार आहे.
या अधिकाऱ्याने पुढे सांगितलं की, याक्षणी कोणतीही आंतरराष्ट्रीय मालिका नाही. कदाचित आयपीएलनंतर काय केले जाऊ शकते ते पाहू. कारण धोनीने देशासाठी बरेच काही केलं आहे आणि सन्मानाने निवृत्त होण्यास तो पात्र आहे. धोनीसाठी एक फेअरवेल मॅच व्हावी हे बीसीसीआयला नेहमीच वाटत होतं. पण धोनी हा वेगळा खेळाडू आहे. जेव्हा त्याने निवृत्तीची घोषणा केली तेव्हा कोणालाही याबद्दल माहिती नव्हती.
धोनीला याबद्दल काही सांगितलं आहे का, असं विचारले असता, अधिकारी म्हणाले, नाही. अर्थात आम्ही आयपीएल दरम्यान धोनीशी याबद्दल बोलू आणि सामना किंवा मालिका याबद्दल त्याचे मत जाणून घेऊ. फेअरवेल मॅच व्हावी यासाठी धोनी सहमत होऊन अगर न होवो, मात्र धोनीचा सन्मान करणे हा आमच्यासाठी सन्मान असणार आहे.
धोनीनं एक क्रिकेटर आणि एक कर्णधार या नात्यानं भारतीय क्रिकेटला भरभरून दिलं आहे. 2007 सालचा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक, 2011 सालचा वन डे विश्वचषक, 2012 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी, याच कालावधीत कसोटी क्रमवारीतला नंबर वन ही सारी कामगिरी म्हणजे कर्णधार म्हणून धोनीच्या यशाचा परमोच्च बिंदू होता. त्याच वेळी एक फलंदाज आणि तेही अखेरच्या षटकांत विजयी घाव घालणारा फलंदाज म्हणून धोनीचं कर्तृत्व खूप मोठं होतं. त्यानं 15 वर्षांच्या कारकीर्दीत 350 वन डे सामन्यांत भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्या खात्यात 10 शतकं आणि 73 अर्धशतकांसह 10 हजार 773 धावा जमा आहेत. धोनीनं 98 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये 37.60 च्या सरासरीनं 1617 फटकावल्या आहेत. ट्वेन्टी ट्वेन्टीत त्याचा स्ट्राईक रेट तर तब्बल 126.13 आहे. ही सारी कामगिरी लक्षात घेऊनच धोनीला कॅप्टन कूल आणि मॅचफिनिशर या उपाधी त्याला मानानं बहाल करण्यात आल्या होत्या.
संबंधित बातम्या
- Suresh Raina Retires | महेंद्र सिंह धोनी पाठोपाठ सुरेश रैनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती
- MS Dhoni Retires: महेंद्रसिंह धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास
- महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर साक्षी भावूक, म्हणते...
- MS Dhoni | 'या' तीन क्षणांनी महेंद्र सिंह धोनीला भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात अढळ स्थान मिळवून दिलं