एक्स्प्लोर
श्रीनिवासन आणि धोनीला बद्रिनाथ हवा होता, मी कोहलीला घेतल्याने मला हटवलं: वेंगसरकर
वेंगसरकर यांनी, बीसीसीआयमधील लॉबिंगबाबतचे गौप्यस्फोट केले.
मुंबई: “तत्कालिन कर्णधार महेंद्रसिंह धोनी, प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि एन श्रीनिवासन यांच्या मताला डावलून, मी चेन्नईच्या बद्रिनाथऐवजी विराट कोहलीला संधी दिली. त्यामुळे मला घरी पाठवण्यात आलं”, असा गौप्यस्फोट निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी केला.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीनं महेश बोभाटे ज्येष्ठ क्रीडा पुरस्कार दिव्य मराठीचे क्रीडा पत्रकार विनायक दळवी यांना देण्यात आला. माजी कसोटीवीर दिलीप वेंगसरकर आणि फारूक इंजिनिअर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आलं.
या पुरस्कारानंतर झालेल्या मुलाखतीत वेंगसरकर यांनी, बीसीसीआयमधील लॉबिंगबाबतचे गौप्यस्फोट केले.
‘कोहलीची निवड केल्याने मला घरी पाठवलं’
तुमच्यासाठी कारकिर्दीतील सर्वात कठीण भूमिका कोणती? खेळाडू, प्रशिक्षक की निवड समितीचे अध्यक्ष? असा प्रश्न दिलीप वेंगसरकर यांना विचारण्यात आला.
त्यावर वेंगसरकर म्हणाले, “मी दोन वर्षे भारतीय क्रिकेट निवड समितीचा अध्यक्ष होतो. ही जबाबदारी माझ्या कारकीर्दीतील सर्वाधिक आव्हानात्मक जबाबदारी होती. माझ्या हाती जेव्हा टीम आली तेव्हा आपण आयसीसीच्या रँकिंगमध्ये पाचव्या स्थानी होतो. त्यानंतर आपण चांगली कामगिरी केली. 2007 मध्ये आपण टी ट्वेण्टी वर्ल्डकप जिंकला.
तेव्हा ऑस्ट्रेलियात उदयोन्मुख खेळाडूंची स्पर्धा होत असे. त्यात आम्ही 23 वर्षांखालील संघ घेऊन जायचे ठरवले. तेव्हा विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारताने 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकलो होतो. त्या संघाचा कर्णधार विराट कोहलीला आम्ही त्या स्पर्धेसाठी निवडले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विराटने 123 धावांची नाबाद खेळी केली. न्यूझीलंड ए संघात अनेक कसोटी खेळाडू होते, मात्र भारतीय संघात तुलनेने कमी अनुभवी खेळाडू होते. त्या परिस्थितीत विराटने चांगली खेळी केली.
त्यावेळी मला वाटलं या मुलाला इंडियाकडून खेळवायला हवं. विराटमध्ये निश्चितच टॅलेंट आहे, याची खात्री पटली. मी भारतात परत आलो, तेव्हा भारतीय संघ वन डे मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जात होता. ती परिस्थिती विराटच्या पदापर्णासाठी योग्य आहे, असं मला वाटलं.
मी आणि माझ्या 4 सहकाऱ्यांनी विराटची भारतीय संघात निवड करण्याचे ठरवले.
मात्र संघप्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी तेव्हा सांगितले की, आम्ही त्याला खेळताना पाहिलेले नाही. त्यामुळे त्याला संघात घेऊ नये.
पण मी त्यांना सांगितलं, तुम्ही बघितलं नसेल, मात्र मी त्याला खेळताना बघितलं आहे, त्याला टीममध्ये घ्यावं लागेल.
कारण मला माहित होतं, त्यांना (धोनी, एन श्रीनिवासन) कळकळ ही साऊथच्या बद्रिनाथची होती. कारण तो एन श्रीनिवासन यांच्या चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू होता. कोहलीला भारतीय संघात घेतल्यास बद्रिनाथ बाहेर जाणार होता, याचं त्यांना दु:ख होतं. तसंच झालं. मी विराटला टीममध्ये घेतलं, बद्रिनाथ बाहेर गेला.
तेव्हा श्रीनिवासन त्यांचा प्लेअर बाहेर गेल्याने वैतागले. तेव्हा श्रीनिवासन बीसीसीआयचे खजिनदार होते.
श्रीनिवासन यांनी त्याबद्दल मला जाब विचारला, तेव्हा विराटला संघात घेणे कसं आवश्यक होते हे मी सांगितले. मग त्यांनी बद्रिनाथने तामिळनाडूकडून खेळताना 800 धावा केल्याचं सांगितलं. त्यावर मी म्हणालो त्यालाही संधी मिळेल. मग श्रीनिवासन म्हणाले तो 29 वर्षांचा आहे, मग संधी कधी देणार? त्यावर मी सांगितलं त्याला संधी मिळेल तेव्हा मिळेल.
यानंतर दुसऱ्याच दिवशी श्रीनिवासन श्रीकांतला घेऊन बीसीसीआयचे तत्कालिन अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे गेले. त्यानंतर मला घरी पाठवण्यात आलं. त्यावेळी माझं निवड समितीचे अध्यक्ष म्हणून करिअर संपलं.”
वेंगसरकर आणि फारुख इंजीनिअर यांनी अशा अनेक किश्श्यांनी या सोहळ्यात रंगत भरली. सूत्रसंचालक अश्विन बापट यांनी या दोघांनाही बोलते केले.
यावेळी फारुख इंजिनिअर यांनी कसोटी क्रिकेट हेच सर्वोत्तम क्रिकेट असल्याचे सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement