Anurag Thakur : देश उभारणीत अधिकाधिक युवकांनी स्वयंसेवक म्हणून नोंदणी करावी, क्रिडामंत्री ठाकूरांचे आवाहन
राष्ट्र उभारणीत तरुणांनी अधिकाधिक सहभाग घ्यावा, असे आवाहन केंद्रीय क्रिडामंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं. राष्ट्रीय सामाजिक सेवा कार्यक्रमांमध्ये युवा स्वयंसेवकांची नोंदणी वाढवावी असेही ते म्हणाले.
Anurag Thakur : राष्ट्र उभारणीत तरुणांनी अधिकाधिक सहभाग घ्यावा, यासाठी नेहरु युवा केंद्र संघटना (NYKS) आणि राष्ट्रीय सामाजिक सेवा (NSS) कार्यक्रमांमध्ये युवा स्वयंसेवकांची नोंदणी वाढवण्याचं आवाहन, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रिडामंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं. गुजरातच्या केवडिया इथं, देशभरातल्या विविध राज्यांच्या क्रिडा आणि युवा व्यवहार मंत्र्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा समारोपात ठाकूर बोलत होते. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित होते. क्रिडा क्षेत्रात भारताला जगातील, पहिल्या दहा देशांमध्ये स्थान मिळावं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असल्याचे ठाकरू म्हणाले.
तरुणांना एकत्र आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज
कोरोनाच्या संकट काळात समाजाची सेवा करण्यात युवा स्वयंसेवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे ठाकूर म्हणाले. भारतातील प्रत्येक राज्यानं युवकांच्या क्षमतांचा लाभ घ्यायला हवा. तसेच, राष्ट्र-निर्मितीच्या प्रकल्पांमध्ये त्यांचा सहभाग वाढवायला हवा. देशातील तरुणांना एकत्र आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आणि देशभरातील युवा स्वयंसेवकांची संपर्क व्यवस्था साखळी तयार करण्यासाठी एक मोबाइल अॅप विकसित करण्याची गरज असल्याचं ठाकूर म्हणाले.
यावर त्यांनी भर दिला. दरम्यान, या दोन दिवसीय परिषदेत 33 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधींसह विविध राज्यांतील 15 युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री सहभागी झाले होते. भारताला क्रिडाक्षेत्रात एक अव्वल राष्ट्र बनवण्याविषयी या राष्ट्रीय व्यासपीठावर सखोल चर्चा झाली.
सामायिक माहिती बँक विकसित करण्याची गरज
दरम्यान, सर्व राज्यांची एक सामायिक माहिती बँक विकसित करण्याची गरज आहे. या बँकेद्वारे, विविध राज्यांमधल्या पायाभूत सुविधा आणि क्रीडा शाखा, प्रशिक्षकांची संख्या, उपकरणे सुविधा यांची माहिती मिळू शकेल जेणेकरुन भविष्यातील नियोजन करताना त्याचा इतरांनाही उपयोग होईल अशी सूचना ठाकूर यांनी केली. आम्हाला आपल्या भविष्यातील नियोजनासाठी शास्त्रीय दृष्टिकोन बाळगण्याची गरज आहे. खेळांमध्ये उत्तम कामगिरी करणारी काही राज्ये आहेत. त्यांच्याकडे चांगले प्रशिक्षक आणि चांगल्या पायाभूत सुविधा आहेत, ज्यांचा उपयोग इतर राज्यांतील खेळाडूंनाही करता येईल, असे ते म्हणाले.
क्रिडा क्षेत्रात भारताला पहिल्या दहा देशात स्थान मिळावं
क्रिडा क्षेत्रात भारताला जगातील, पहिल्या दहा देशांमध्ये स्थान मिळावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी, एकमेकांमध्ये समन्वय महत्त्वाचा ठरेल असे टाकूर म्हणाले. आपली धोरणे आखताना, खेळाडूंना नेहमीच केंद्रस्थानी ठेवले पाहिजे.त्यांना सर्व सोयी सुविधा सहज उपलब्ध होतील, याची व्यवस्था केली पाहिजे, असेही ठाकूर यांनी सांगितलं.