लॉकडाऊननंतर होणारी पहिली मोठी 'मल्लखांब चॅम्पियन्स ट्रॉफी'; मुंबईत स्पर्धेचे आयोजन
Mallakhamba In Mumbai : मुंबईत लॉकडाऊननंतर पहिलीच मल्लखांब स्पर्धा रंगणार आहे. ही स्पर्धा 16 आणि 17 एप्रिल दरम्यान रंगणार आहे.
Mallakhamba : मुंबईत मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पहिलीच मोठी मल्लखांब चॅम्पियन्स ट्ऱॉफी स्पर्धा आहे. गोरेगांव जिमखाना आणि फुलसर्कल कम्युनिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली आहे. ही स्पर्धा खुल्या गटात होणार असून 10 वर्षांच्या अगदी लहान खेळाडूपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा खेळलेले अनुभवी खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी राज्यातल्या अनेक खेळाडूंनी कंबर कसली आहे. लॉकडाउनंतर ही स्पर्धा होत असल्याने अनेकांचे लक्ष लागले आहे.
लॉकडाऊन नंतर बर्याच स्पर्धा अशा झाल्या नाहीत. त्या दृष्टिने ही स्पर्धा खूपच उपयोगी ठरेल असे वर्ल्ड चॅम्पियनशिप विजेत्या दीपक शिंदे या मल्लखांबपटूने सांगितले. ही स्पर्धा खुल्या गटात होणार असल्याने खेळण्यासाठी खूप उत्सुक असल्याचेही त्याने सांगितले. स्पर्धेच्या निमित्ताने नवीन अणि अनुभवी अशा दोन्ही प्रकारच्या खेळाडूंशी सामना करायची संधी मिळेल. हा अनुभव नक्कीच वेगळा ठरेल असा विश्वास त्याने व्यक्त केला. दीपक मागील 19 वर्षांपासून मल्लखांब खेळत असून त्याने राष्ट्रीय अणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धा खेळल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत मल्लखांब आणि दोर मल्लखांब अशा दोन्ही प्रकारात मुले व मुली सहभागी होतील. यात प्रत्येकी 20 संघ सहभागी होणार आहेत.
शालेय विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कंबर कसली आहे. शाळा अणि अभ्यास सांभाळून रोज साडेतीन तास सराव करत असल्याचे निशिता पाठक या मल्लखांबपटू असलेल्या विद्यार्थीनीने सांगितले. गोरेगाव जिमखान्यातील स्पर्धा खुल्या वयोगटातली असल्याने अनुभवी खेळाडूंची कामगिरी जवळून पाहण्याची संधी मिळणार असल्याचे तिने नमूद केले. दोर मल्लखांब प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे तिचे स्वप्न आहे.
स्पर्धेची वैशिष्ट्ये:
स्पर्धा खुल्या गटात होणार असून वेगवेगळ्या वयोगटातील मल्लखांबपटूंचे कौशल्य दिसून येणार आहे. या स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी होणार आहेत. मल्लखांब चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत 40 संघांचा सहभाग असणार आहे. मल्लखांब आणि दोर मल्लखांब अशी स्पर्धा होणार असून 16 व 17 एप्रिल रोजी स्पर्धा पार पडणार आहे.
स्पर्धेचे स्थळ व वेळ:
दिनांक 16 व 17 एप्रिल 2022 रोजी पार पडणार असून दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत ही स्पर्धा होणार आहे. मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील मसूराश्रमाच्या समोर असलेल्या पांडुरंगवाडी मैदानात ही स्पर्धा पार पडणार आहे.