Maharashtra Kesari 2023: बीडच्या आशिष तोडकर कोल्हापूरच्या सुरज अस्वले यांची विजयी सलामी
Maharashtra Kesari 2023: आशिष तोडकर, सुरज अस्वले, स्वप्नील शेलार, प्रतिक जगताप, ओंकार भोईर यांची विजयी सलामी
Maharashtra Kesari 2023: बीडच्या आशिष तोडकर, कोल्हापूरच्या सुरज अस्वले, पुणे जिल्ह्याच्या स्वप्नील शेलार यांनी 57 किलो गटातून तर, पुणे जिल्ह्याच्या प्रतिक जगताप, कल्याणच्या ओंकार भोईर, जळगावच्या ऋषिकेश वैरागी यांनी 86 किलो वजनी गटातून आपापल्या प्रतीस्पर्धीना पराभूत करताना स्पर्धेत विजयी सलामी दिली.
86 किलो वजनी गटात जालना जिल्ह्याच्या अभिषेक परीवले याने पिंपरी चिंचवडच्या शेखर लोखंडेला 14-4 असे पराभूत केले. कोल्हापूरच्या ऋषिकेश पाटीलने गिरीधर डुबेला 4-0 असे पराभूत केले. जळगावच्या योगेश वैरागीने अमरावतीच्या विवादासला चीतपट करताना आगेकूच केली. कल्याणच्या ओंकार भोईरने चंद्रपूरच्या फैजान शेखला 10-0 असे पराभूत केले. पुणे जिल्ह्याच्या प्रतिक जगतापने सांगलीच्या भरत पवारवर ७-६ अशी मात केली.
57 किलो वजनी गटात बीड आशिष तोडकरने कोल्हापूर शहरच्या अतुल चेचर याला 9-4 असे एकतर्फी पराभूत केले. याच गटात कोल्हापूरच्या सुरज अस्वलेने जळगावच्या यशवंतवर 11-0 अशी मात करताना आगेकूच राखली. पुणे जिल्ह्याच्या स्वप्नील शेलारने नागपूरच्या अंशुल कुंभारकरला थेट चीतपट केले. यवतमाळच्या यश राठोडने नाशिकच्या समर्थ गायकवाडला 12-05 असे पराभूत केले. भंडारा जिल्ह्याच्या अतुल चौधरीने रत्नागिरीच्या भावेशला 10-0 असे एकतर्फी पराभूत केले.
दिमाखदार व नेत्रदीपक आयोजन
संस्कृती प्रतिष्ठानचे वतीने संस्थापक अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे दिमाखदार आयोजन आणि प्रत्येक वजन गटात विजेत्यांना मिळणारी भरघोस बक्षिसे यामुळे ही स्पर्धा सुरवातीपासूनच चर्चेत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील शहरातील तालीम संघातील स्पर्धकांनी देखणे संचलन यावेळी केले. महाराष्ट्र पोलीस बँडने यावेळी मानवंदना दिली. उद्घाटनालाच कुस्ती शौकिनांनी केलेली गर्दी पाहता शेवटच्या दिवशी अंतिम कुस्ती पाहण्यासाठी किती गर्दी होईल याचीच प्रचिती आज आली.
65 व्या 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन
"आजी-माजी कुस्तीगिरांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार सकारात्मक असून, कुस्तीगिरांना आरोग्य सुविधा, सन्मानजनक मानधन, निवृत्तीवेतन व अन्य सुविधा देण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ," असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, तसेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समिती आणि संस्कृती प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनावेळी चंद्रकांतदादा पाटील बोलत होते. कोथरूड येथील कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत वरिष्ठ गट गादी व माती राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत आहेत. उद्घाटनाची कुस्ती माती विभागातील 86 किलो वजनी गटात जालना जिल्ह्याच्या अभिषेक परीवले व पिंपरी चिंचवडच्या शेखर लोखंडे यांच्यात झाली. अभिषेक परीवले याने 14-04 अशा गुणांच्या फरकाने लोखंडेवर विजय मिळवला.