KKR vs RCB IPL 2020: कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात आज काटे की टक्कर! या खेळांडूवर भिस्त
KKR vs RCB IPL 2020: आयपीएलच्या या मोसमात कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या दोन्ही संघांनी चांगली कामगिरी बजावली आहे. मात्र, कोलकाताचे काही स्टार खेळाडू त्यांच्या फॉर्मशी झगडत आहेत.
KKR vs RCB IPL 2020: आयपीएलचा 39 वा सामना बुधवारी अबुधाबीच्या शेख जाएद स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाईल. एकीकडे बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आणि स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्स जबरदस्त फॉर्ममध्ये आले आहेत, तर कोलकाता संघातील बहुतेक खेळाडू आपल्या फॉर्मशी झगडताना दिसत आहेत.
दोन्ही संघांनी त्यांचे मागील सामने जिंकले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने मागील सामन्यात राजस्थानचा पराभव केला, तर कोलकाताने सुपर ओव्हरमध्ये सनरायझर्स हैदराबादला धुळ चारली. बँगलोरने 9 सामन्यापैकी 6 जिंकून गुणतालिकेत तिसऱ्या नंबरवर आहे. तर कोलकाता 9 सामन्यांमधील 5 विजयांसह पॉईंटटेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे अबू धाबीमधील हा सामना रोमांचक होईल अशी अपेक्षा आहे.
कोहली, डिव्हिलियर्स आणि चहलची जादू चालणार?
रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कोहलीने आतापर्यंत 9 सामन्यात 57.83 च्या सरासरीने 347 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर, एबी डिव्हिलियर्सही तुफान फॉर्मात आलेला दिसतोय. डिव्हिलियर्सने अखेरच्या सामन्यात राजस्थानविरुद्ध 22 बॉलमध्ये नाबाद 55 धावा केल्या.
याशिवाय बँगलोरचा सलामीवीर देवदत्त पडलिकलनेही आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित करत आहे. गोलंदाजीमध्ये फिरकीपटू यजुवेंद्र चहलने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत 9 सामन्यांत 13 बळी घेतले आहेत. अशा परिस्थितीत कोलकाता विरुद्ध कोहली, डिव्हिलियर्स आणि चहल हे तिघेही सामना फिरवू शकतात.
IPL 2020: दिल्लीवर विजय मिळवत Points Tableमध्ये पंजाबची बढती, Delhi Capitals टॉपवर तर चेन्नई तळाला
मॉर्गन, कार्तिक आणि फर्ग्युसनही डाव उलटवण्यात माहिर
कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार इयोन मॉर्गन आणि दिनेश कार्तिक हे गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करताना दिसले आहेत. मात्र, या दोघांनी आतापर्यंत मोठे डाव खेळलेले नाहीत. या दोन्ही फलंदाजांमध्ये मोठी क्षमता असून ते सामना फिरवण्यास सक्षम आहेत. शेवटच्या सामन्यात मॉर्गनने 23 चेंडूत 24 आणि कार्तिकने 14 चेंडूत 29 धावांची खेळी करत डाव साकारला होता.
याशिवाय कोलकाताकडून पहिला सामना खेळणार्या लॉकी फर्ग्युसनने 4 षटकांत 15 धावा देऊन 3 गडी बाद करून घातक गोलंदाजी केली. इतकेच नाही तर फर्ग्युसनच्या जीवावर कोलकाताने सुपर ओव्हरमध्ये हैदराबादला सहज पराभूत केलं. त्याने सुपर ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेत संघाचा विजयाचा मार्ग सुकर केला होता.