(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Khelo India Youth Games 2022 : खो-खोमध्ये मुला-मुलींचे शानदार विजय, फायनलमध्ये ओरिसासोबत होणार लढत
Khelo India Youth Games 2022 : खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघांनी सेमिफायनलमध्ये डावाने विजय मिळवित फायनलमध्ये प्रवेश केला.
Khelo India Youth Games 2022 : खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघांनी सेमिफायनलमध्ये डावाने विजय मिळवित फायनलमध्ये प्रवेश केला. उद्या (सोमवारी) सकाळी दोन्ही संघांचे सामने ओरिसासोबत होणार आहेत. महाराष्ट्राने लौकिकाला साजेसा खेळ करीत वाहवा मिळवली. पश्चिम बंगालच्या मुलींसोबत पहिला सामना झाला. एक डाव आणि एक गुणाने विजय मिळाल्याने मुली फायनलमध्ये पोहचल्या. पश्चिम बंगालने आक्रमण करताना महाराष्ट्राचे केवळ तीन गडी बाद केले. पहिल्या तिघींनी तब्बल साडेसहा मिनिटे संरक्षण केले. पुन्हा मैदानात आलेल्या तिघी बंगालच्या आक्रमकांच्या हाती सापडल्या नाहीत.
महाराष्ट्राने पश्चिम बंगालवर हल्ला चढवित त्यांचे ९ गडी गारद केले. त्यामुळे पहिल्या डावात सहा गुणांच्या आघाडीसह फॉलोऑन देता आला. दुसऱ्या डावात महाराष्ट्राने संरक्षण करताना पाचच गडी गमावले. त्यामुळे १ डाव आणि एका गुणाने महाराष्ट्राने विजयासह फायनल गाठली. दीपाली राठोड २.३० मिनिटे, अश्विनी शिंदे २.१० मिनिटे, मयुरी पवार २.३०, जान्हवी पेठे २.१०, प्रीती काळे २.३५ मिनिटे, गौरी शिंदे, जान्हवी पेठे, संपदा मोरे यांनी दीड मिनिटे संरक्षण केले. अश्विनी शिंदे दुसऱ्या डावात (१ मिनिट) नाबाद राहिली. संपदाने ३ तर श्रेया पाटीलने २ गडी बाद केले.
दिल्लीची दाणादाण
महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने दिल्लीची पार दाणादाण उडवली. एक डाव आणि सहा गुणांनी विजयश्री खेचून आणली. महाराष्ट्राने पहिल्या डावात त्यांचे तब्बल १५ गडी तंबूत धाडले. दिल्लीला केवळ पाच गडी बाद करता आले. त्यामुळे महाराष्ट्राला १० गुणांच्या आघाडीसह फॉलोऑन मिळाला. दुसऱ्या डावात दिल्लीला जेमतेम चार गडी हाती सापडले. शुभम थोरातने २.२० मिनिटे संरक्षण केले. तसेच आक्रमणात एक गडीही बाद केला. आकाश तोगरे आणि सुफियान शेखने प्रत्येकी तीन गडी टिपले. अभिमन्यू पुरस्कार विजेता आदित्य कुदळेने २.३० मिनिटे संरक्षण करीत १ गडी, ऋषिकेश शिंदेने २.१० मिनिटे संरक्षणासह २ गडी बाद केले. अर्णव पाटणकरने २.३० मिनिटांचे नाबाद संरक्षण केले. तसेच एकही गडी बाद केला. रामजी कश्यप २.३० व नरेंद्र कातकडेनेही तितकाच वेळ संरक्षण करीत महाराष्ट्राच्या विजयात हातभार लावला. मुलांचाही अंतिम सामना ओरिसासोबत होणार आहे.