भारताची लेडी अनिल कुंबळे... महिला अंडर-19 वन डे करंडकात काश्वी गौतमची विक्रमी कामगिरी
चंदिगढच्या काश्वी गौतमने अरुणाचलविरुद्धच्या सामन्यात दहाही फलंदाजांना माघारी धाडलं. या कामगिरीसह एका डावात दहा विकेट घेणारी ती दुसरी तर भारतातली पहिलीच महिला क्रिकेटर ठरली आहे.
![भारताची लेडी अनिल कुंबळे... महिला अंडर-19 वन डे करंडकात काश्वी गौतमची विक्रमी कामगिरी kashvee gautam who took 10 wickets in the under 19 oneday match latest update भारताची लेडी अनिल कुंबळे... महिला अंडर-19 वन डे करंडकात काश्वी गौतमची विक्रमी कामगिरी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/26032437/Kashwi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कडपा (आंध्र प्रदेश) : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात दमदार कामगिरी बजावताना दिसतोय. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन अंडर-19 वन डे करंडकात चंदिगढच्या एका मुलीने अनिल कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. चंदिगढच्या काश्वी गौतमने अरुणाचलविरुद्धच्या सामन्यात दहाही फलंदाजांना माघारी धाडलं. या कामगिरीसह एका डावात दहा विकेट घेणारी ती दुसरी तर भारतातली पहिलीच महिला क्रिकेटर ठरली आहे.
बीसीसीआयची अंडर 19 महिला वन डे करंडक क्रिकेट स्पर्धा सध्या सुरु आहे. त्यातल्याच चंदिगढ विरुद्ध अरुणाचल प्रदेश सामन्यात काश्वीनं अष्टपैलू कामगिरी बजावली. या सामन्यात काश्वी गौतमच्य़ाच 49 धावांच्या खेळीच्या जोरावर चंदिगढनं 50 षटकांत 4 बाद 186 धावा उभारुन अरुणाचलला 187 धावांचं आव्हान दिलं होतं. पण या आव्हानाचा पाठलाग करताना अरुणाचलचे फलंदाज अवघ्या 25 धावातच गारद झाले. आणि या सर्व विकेट्स काश्वी गौतमनं घेतल्या. काश्वी गौतमनं या सामन्यात 4.5 षटकं गोलंदाजी करताना एका निर्धाव षटकासह अवघ्या 12 धावा मोजून सर्वच्या सर्व दहा फलंदाजांना माघारी धाडलं. त्यामुळे चंदिगढनं 161 धावांनी दणदणीत विजय साजरा केला.
Hat-trick ✅ 10 wickets in a one-day game ✅ 49 runs with the bat ✅ Leading from the front ✅
4.5-1-12-10! ???????? Kashvee Gautam stars as Chandigarh beat Arunachal Pradesh in the @paytm Women’s Under 19 One Day Trophy. ???????? #U19Oneday Scorecard ???????? https://t.co/X8jDMMh5PS pic.twitter.com/GWUW9uUgtF — BCCI Women (@BCCIWomen) February 25, 2020
दहा विकेट्स घेणारी दुसरी महिला खेळाडू
काश्वी गौतम ही एकाच डावात दहा विकेट्स घेणारी आजवरची दुसरी महिला खेळाडू ठरली आहे. याआधी नेपाळची डावखुरी फिरकी गोलंदाज मेहबूब आलमनं पहिल्यांदा दहा विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवला होता. तिनं आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीगमध्ये मोझांबिकविरुद्धच्या सामन्यात 12 धावा देत दहा विकेट्स घेतल्या होत्या.
डावात दहा विकेट्स घेणारे विक्रमवीर
जिम लेकर (इंग्लंड)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात एका गोलंदाजानं दहा विकेट्स घेण्याची किमया आजवर केवळ दोन वेळाच घडली आहे. 1956 साली इंग्लंडचे ऑफ स्पिनर जीम लेकर यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीत आपल्या जादुई फिरकीनं पहिल्यांदाच एका डावात दहाही फलंदाजांना माघारी धाडण्याचा पराक्रम गाजवला होता. लेकर यांनी दुसऱ्या डावातही 9 विकेट्स घेऊन या सामन्यात एकूण 19 विकेट्स घेतल्या होत्या. हा विक्रम आजही अबाधित आहे.
अनिल कुंबळे (भारत)
जिम लेकर यांच्यानंतर 43 वर्षांनी भारताच्या अनिल कुंबळेनं कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा एकाच डावात दहा विकेट्स घेतल्या होत्या. कुंबळेनं 1999 साली पाकिस्तानविरुद्धच्या दिल्ली कसोटीत ही विक्रमी कामगिरी बजावली होती. जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांच्याशिवाय भारताचा माजी वेगवान गोलंदाज देवाशिष मोहंतीनं दुलीप करंडकात ईस्ट झोनकडून खेळताना साऊथ झोनचा अख्खा संघ गुंडाळला होता. तर मणिपूरच्या रेक्स सिंगनं कूच बिहार करंडकात एकाच डावात दहा विकेट्स घेतल्या होत्या.
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)