IPL 2022: आयपीएलमधील खास विक्रमापासून युजवेंद्र चहल फक्त एक विकेट दूर, आजच्या सामन्यात रचणार इतिहास?
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पहिल्या प्लेऑफच्या सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (Gujarat Titans vs Rajasthan Royals) यांच्यात खेळला जाईल.
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पहिल्या प्लेऑफच्या सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (Gujarat Titans vs Rajasthan Royals) यांच्यात खेळला जाईल. कोलकाताच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) हा सामना खेळला जाणार आहे. यासामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. तर, पराभूत झालेल्या संघाला एक संधी मिळेल. हा संघ क्वालिफायर 2 मध्ये एलिमिनेटरच्या विजेत्या संघाशी खेळेल. आजच्या सामन्यात राजस्थानचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) एक खास विक्रम आपल्या नावावर करू शकतो. या विक्रमापासून चहल केवळ एक विकेट दूर आहे.
इमरान ताहिरचा विक्रम मोडण्याची संधी
गुजरातविरुद्ध सामन्यात युजवेंद्र चहलनं एक विकेट घेतल्यास तो आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरेल. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इमरान ताहीर अव्वल स्थानी आहे. ताहीरनं 2019 मध्ये चेन्नईकडून खेळताना 26 विकेट्स घेतल्या आहेत. अजूनही कोणत्याही गोलंदाजाला त्याच्या विक्रम मोडता आला नाही. यंदाच्या हंगामात युजवेंद्र चहलनं आतापर्यंत 16.53 च्या सरासरीनं आणि 7.67 च्या इकॉनमी रेटनं 26 विकेट घेतले आहेत. पर्पल कॅपही त्याच्याकडं आहे.
अमित मिश्राच्या विक्रमाशीही बरोबरी करण्याची संधी
याशिवाय, युजवेंद्र चहलनं एक विकेट घेतल्यास तो अमित मिश्राच्याही विक्रमाशी बरोबरी करेल. आयपीएलमध्ये अमित मिश्रानं 154 सामन्यात 23.98 च्या सरासरीनं आणि 7.36 च्या इकोनॉमीनं 166 विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडं युजवेंद्र चहलनं त्याच्या आयपीएलच्या कारकिर्दीत 128 सामन्यात 21.38 च्या सरासरीनं आणि 7.60 इकोनॉमीनं 165 विकेट्स घेतल्या आहेत. या सामन्यात युजवेंद्र चहलनं दोन विकेट्स घेतल्यास तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज ठरेल.
हे देखील वाचा-