दिल्ली-पुण्याच्या नावावर लाजिरवाणा विक्रम, सर्वाधिक सामने गमावत केला नकोसा विक्रम
IPL History : चेन्नई आणि आरसीबी यांच्या सामन्यानं 22 मार्च रोजी आयपीएलच्या रनंसग्रामाला सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात अनेक विक्रम होतील, काही मोडले जातील.
Top-5 Losing Streaks In IPL History : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. चेन्नई आणि आरसीबी यांच्या सामन्यानं 22 मार्च रोजी आयपीएलच्या रनंसग्रामाला सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात अनेक विक्रम होतील, काही मोडले जातील. चौकार-षटकारांचा पाऊस पडेल. एका चषकासाठी दहा संघ मैदानात उतरतील. प्रत्येक संघ प्रत्येक सामना जिंकण्याचा जिवापाड प्रयत्न करेल. पण तुम्हाला माहितेय का, आयपीएलमध्ये लागोपाठ सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम कोणत्या संघाच्या नावावर आहे. हा लाजिरवाणा विक्रम कोणत्या संघाने केलाय? याबाबत जाणून घेऊयात..
दिल्ली अन् पुणे संघाच्या नावावर लाजिरवाणा विक्रम -
आयपीएलच्या इतिहासात सलग सर्वाधिक सामने गमावण्याचा लाजिरवाणा विक्रम दिल्ली कॅपिटल्स आणि पुणे वॉरियर्स इंडियाच्या नावावर आहे. आयपीएल 2014 हंगामात दिल्ली कॅपिटल्सने सलग 11 सामने गमावले होते. तर आयपीएल 2012 च्या मोसमात पुणे वॉरियर्स इंडिया संघाने सलग 11 सामने पराभवाचा सामना केला होता. यानंतर पुणे वॉरियर्स इंडियाही या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. आयपीएल 2013 च्या मोसमात पुणे वॉरियर्स इंडियाला सलग 9 पराभवांचा सामना करावा लागला होता.
गौतम गंभीरच्या नावावरही लाजिरवाणा विक्रम -
लागोपाठ सर्वाधिक सामने गमावण्याचा विक्रम कोलकात्याच्याही नावावर आहे. यायादीत कोलकाता चौथ्या क्रमांकावर आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वातील कोलकाता संघाने लागोपाठ 9 सामने गमावले होते. आयपीएल 2013 च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या नावावर या लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. या यादीमध्ये मुंबई इंडियन्सचाही समावेश आहे. मुंबई इंडियन्सने विक्रमी 5 वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे, परंतु या यादीत मुंबई इंडियन्सचे नाव आहे. आयपीएल 2022 च्या हंगामात मुंबई इंडियन्सने सलग 8 सामने गमावले होते.
सौरव गांगुली आणि अंजलो मॅथ्यूजच्या नावावरही लाजिरवाणा विक्रम -
आयपीएल 2012 च्या हंगामात सौरव गांगुली हा पुणे वॉरियर्स इंडियाचा कर्णधार होता. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली पुणे वॉरियर्स इंडियाने सलग 11 सामने हरण्याचा लाजिरवाणा विक्रम केला होता. तर आयपीएल 2013 च्या मोसमात पुणे वॉरियर्स इंडियाचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज होता. त्यालाही संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले होते. आयपीएल 2011 ते पुढील 3 हंगाम, पुणे वॉरियर्स इंडिया या स्पर्धेचा एक भाग होता. 2013 मध्ये पुणे संघाने सलग 9 सामन्यात पराभवाचा सामना केला होता. आयपीएल 2014 च्या हंगामात केविन पीटरसन दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता. केविन पीटरसनच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सला सलग 11 पराभवांचा सामना करावा लागला होता.