RCB चा पराभवाचा षटकार, हैदराबादनं 25 धावांनी हायस्कोरिंग सामना जिंकला!
RCB vs SRH : हायस्कोरिंग सामन्यात हैदराबादनं आरसीबीचा 25 धावांनी पराभव केला. हैदराबादनं दिलेल्या 288 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीनं 262 धावांपर्यंत मजल मारली.
RCB vs SRH : हायस्कोरिंग सामन्यात हैदराबादनं आरसीबीचा 25 धावांनी पराभव केला. हैदराबादनं दिलेल्या 288 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीनं 262 धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीकडून दिनेश कार्तिक आणि फाफ डु प्लेसिस यांनी लढा दिला, पण विजय मिळून देऊ शकले नाहीत. हैदराबादकडून पॅट कमिन्स यानं भेदक मारा केला. कमिन्सनं आरसीबीच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं. आरसीबीला सात सामन्यात सहा पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादनं चौथ्या विजयाची नोंद केली. हैदराबादचा संघ आठ गुणांसह चौथ्या स्थानावर विराजमान आहे.
बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आज चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला. हैदराबाद संघाकडून 22 षटकार लगावण्यात आले तर आरसीबीकडून 16 षटकार ठोकण्यात आले. हैदराबादच्या फलंदाजांनी 19 चौकार ठोकले तर आरसीबीकडून 24 चौकारांचा पाऊस पाडण्यात आला. 40 षटकांमध्ये हैदराबाद आणि आरसीबी संघानं 547 धावांचा पाऊस पाडला. हैदराबादनं प्रथम फलंदाजी करताना तीन बाद 287 धावा केल्या होत्या. ट्रेविस हेड यानं शतक ठोकलं, तर हेनरिक क्लासेन यानं अर्धशतकी तडाखा दिला. आरसीबीनं 288 धावांचा पाठलाग करताना शर्थीचं प्रयत्न केले. आरसीबीनं 20 षटकांत 7 विकेटच्या मोबदल्यात 262 धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीकडून दिनेश कार्तिक आणि फाफ डु प्लेलिस यांनी अर्धशतकी खेळी केली.
विराट-फाफची आक्रमक सुरुवात -
288 धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आणि फाफ डु प्लेलिस यांनी आक्रमक सुरुवात केली. दोघांनीही हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पॉवरप्लेमध्ये आरसीबीने 79 धावा वसूल केल्या. पॉवरप्लेमध्ये आरसीबीचा संघ वरचढ दिसत होता, कारण हैदराबादनं फलंदाजी करताना 76 धावा केल्या होत्या. पण मयांक मार्कंडेय यानं विराट कोहलीला बाद करत आरसीबीच्या फलंदाजीला सूरंग लावला. विराट कोहलीनं 20 चेंडूमध्ये 42 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये विराट कोहलीनं दोन षटकार आणि सहा चौकार ठोकले. विराट कोहली बाद झाल्यानंतर आरसीबीची फलंदाजी ढेपाळली. विल जॅक्स 7, रजत पाटीदार 9, सौरव चौव्हाण 0 यांना मोठी खेळी करता आली नाही. विराट बाद झाल्यानंतर आरसीबीने सातत्यानं विकेट फेकल्या.
फाफचं आक्रमक अर्धशतक -
एकापाठोपाठ एक विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला फाफ डु प्लेलिस यानं आक्रमक फंलदाजी केली. फाफ डु प्लेलिस यानं 28 चेंडूमध्ये 62 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये फाफ यानं चार षटकार आणि सात चौकार ठोकले. फाफ डु प्लेलिस याला सुरुवातीला एकाही फंलदाजाने साथ दिली नाही. ठरावीक अंतरानं विकेट फेकल्यामुळे आरसीबीपुढे आव्हान खडतर झालं.
दिनेश कार्तिककडून झुंज -
अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना दिनेश कार्तिक यानं शानदार फलंदाजी केली. कार्तिक यानं हैदराबादच्या प्रत्येक गोलंदाजांचा समाचार घेतला. कार्तिकला दुसऱ्या बाजूनं आक्रमक साथ न मिळाल्यानं आरसीबीनं सामना गमावला. दिनेश कार्तिक यानं 35 चेंडूमध्ये 83 धावांची झंझावती खेळी केली. यामध्ये सात षटकार आणि पाच चौकारांचा समावेश होता. कार्तिक यानं अखेरच्या क्षणापर्यंत आरसीबीसाठी झुंज दिली. पण हैदाराबादनं सामन्यात बाजी मारली. अनुज रावत यानं 25 तर महिपाल रोमरोर यानं 19 धावांची खेळी केली.
पॅट कमिन्सचा भेदक मारा -
हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्स सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. कमिन्स यानं आरसीबीच्या तीन फलंदाजांना बाद केले. कमिन्स यानं 4 षटकात 43 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. मयांक मार्केंडेय यानं दोन विकेट घेतल्या. तर नटराजन याला एक विकेट मिळाली.